फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

शाडूच्या मूर्तींना द्या प्राधान्य

शाडूच्या मूर्तींना द्या प्राधान्य

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : येत्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या काळात नागरिकांनी केवळ शाडू मातीच्या मूर्तीवापरास प्राधान्य द्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने बुधवारी केले आहे.

पालिका आणि शहरातील नागरिकांनी नेहमीच पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले आहे. शहर पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित राहील यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे असणार आहे. त्यामुळे शहराच्या आरोग्याची काळजी घेता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातील मूर्ती तयार करणारे कारागिर, मूर्तीकार तसेच उत्पादकांनी केवळ शाडू मातीच्या मूर्तींची निर्मिती आणि विक्री करावी. नागरिकांनी केवळ शाडूमातीच्या नैसर्गिक रंग वापरून तयार केलेल्या आणि पाण्यात सहज विरघळणाऱ्या मूर्त्या तसेच पर्यावरणपूरक सजावटीचे पूजा साहित्य वापरून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

ते म्हणाले की, पालिका क्षेत्रातील जल, वायू, ध्वनी प्रदूषणाबाबत कारवाईचे अधिकार पालिका आयुक्तांचे आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सह या अनुषंगाने वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यावर कारवाई केली जाणार आहे.

पीओपी मूर्ती उत्पादनावर बंदी
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांनुसार पीओपी मूर्ती उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या कार्यक्षेत्रातील मूर्ती बनवणारे कारागीर, मूर्तीकार आणि उत्पादक यांना पीओपी मूर्ती बनविण्यावर बंदी असणार आहे. पर्यावरणपूरक मूर्तीचे उत्पादन आणि विक्री करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने पालिकेच्या उद्योगधंदा व परवाना विभागाशी संपर्क साधून गणेशमूर्ती स्टॉलबाबत परवानगी घेऊन त्याची प्रत मूर्ती विक्रीचे दुकान किंवा स्टॉलच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक असणार आहे, असे पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

अशी करा पर्यावरणपूरक मूर्ती
मूर्ती तयार करण्यासाठी नैसर्गिक चिकणमाती, बांबू आणि लाकडाचे तुकडे, ऊसाच्या काड्या, ठोकडे, तुरटीमध्ये मिसळलेली चिकणमाती, मूर्ती रंगविण्यासाठी नैसर्गिक रंग आवश्यक आहे. तर सजावटीसाठी नालीदार चादरी, कापड, लाकूड, बांबू, नैसर्गिक फुले आणि इतर पुनर्वापर केलेल्या साहित्याचा वापर होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिका घेणार इको-फ्रेंडली स्पर्धा
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदा प्रथमच पालिकेच्या शाळांमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्ती निर्मिती आणि सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणपतीच्या मूर्ती आणि सजावट तीन ते पाच सप्टेंबरच्या कालावधीत प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"