स्पेशल मुलांचा स्पेशल बाप्पा

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड मधील झेप पुनर्वसन केंद्र या संस्थेतील मुलांनी पर्यावरण पूरक नैसर्गिक गायीच्या शेणापासून व शेतातील माती पासून गोमय गणपती बनवण्याची सुरुवात केली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती मूर्ती वापरू नयेत आणि शाडूच्या अर्थात पर्यावरणपूरक गणपती मूर्तींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन वारंवार पर्यावरण प्रेमी आणि तज्ज्ञांकडून होत असताना आता झेप पुनर्वसन केंद्रातील मुलेसुद्धा मागे राहिलेली नाहीत. त्यांनी तयार केलेल्या गणपती मूर्ती या पीओपी तर सोडाच पण शाडू मातीच्या गणपतींपेक्षा देखील पर्यावरण पूरक आहे.
काय आहे विशेष या मूर्तींमध्ये?
संस्थेतील मुलांनी सिंधुदुर्ग येथील भगीरथ प्रतिष्ठान झाराप येथे जाऊन गोमय गणपती कसा तयार केला जातो, याची प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या मदतीने मूर्ती बनविण्यास प्रारंभ केला. हे गणपती बनवण्यासाठी भरपूर मेहनत लागते. गोमय गणपती म्हणजे गाईचे शेण व माती हे एकत्र करून साच्याच्या साह्याने गणपती तयार केला जातो. ह्या गणपतीचे विसर्जन करणे सहज सोपे आहे . त्याचे शाडू मातीच्या गणपतीपेक्षा देखील लवकर विघटन होते. आणि शिवाय, विघटन झालेल्या मातीचा उपयोग झाडांना खत म्हणून करता येतो. त्यामुळे येत्या गणेशोत्सवात या मुलांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक गोमय गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. झेपमधील मुलांनी जूनमध्ये गणपती बनवण्यास सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत १०० पर्यंत गणपती मूर्ती तयार करून झाल्या आहेत. ऑर्डर बुक करण्यासाठी संपर्क –
झेप पुनर्वसन केंद्र
पत्ता :- सर्व्हे. नं. १४४ वास्तु उद्योग कॉलनी, अजमेरा जय मल्हार हॉटेल जवळ, पिंपरी पिंपरी-चिंचवड -४११०१८.
दूरध्वनी क्रमांक – ८२३७००३६६०