फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी चुरस

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी चुरस

पिंपरी : विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अजित गव्हाणे यांनी भोसरी मतदारसंघ महायुतीत भाजपला दिला जाईल, असे गृहीत धरून १६ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेल्यांना मात्र आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे शहराध्यक्षाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अजित गव्हाणे यांनी माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शहराध्यक्षानेच पक्ष सोडल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आणखी पडझड होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांची पुण्यात बैठक घेतली. शरद पवारांच्या मेळाव्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरात येत कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला. शहराध्यक्ष गव्हाणे एकटेच राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात गेले. लवकरच अध्यक्षाची नियुक्ती केली जाईल, असे पवार यांनी सांगून दहा दिवस झाले. परंतु, अद्याप शहराध्यक्षाची नियुक्ती झालेली नाही.

पिंपरी-चिंचवड या अजित पवार यांच्या एकेका‌ळच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा शहर अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करायची याचा तिढा गेल्या १५ दिवसांत सुटू शकलेला नाही. शहराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेल्यांना मात्र आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे शहराध्यक्षाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहराध्यक्षपदासाठी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी, नाना काटे, श्याम लांडे यांची नावे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुचविल्याचे सांगितले जाते. त्यांपैकी बनसोडे विधानसभा लढणार असून, बहल यांना राज्यपालनियुक्त आमदारकी देण्याची मागणी आहे. तर, काटे, भोईर हे चिंचवडमधून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले जाते. महायुतीत चिंचवड मतदारसंघ भाजपकडे कायम राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढविण्याची वेळ आली, तर दोन महिन्यांसाठी शहराध्यक्षपद कशाला घ्यायचे, अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"