डेंगीमुक्त मोहिमेला पिंपरीत प्रारंभ

पिंपरी, प्रतिनिधी : डेंगीचा प्रादूर्भाव रोखणे आणि जनजागृती यांसाठी महापालिकेने डेंगीमुक्त पिंपरी-चिंचवड मोहीम
राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये पुढील संपूर्ण आठवडाभर शहरात ठिकठिकाणी विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
बैठकीला संबोधित करताना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, डेंगीला रोखणे पालिकेचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि आंतरविभागीय समन्वय राखणे या अनुषंगाने बीट डेंगी मोहिम उपयुक्त ठरणार आहे. नागरिक जागरूक असणे गरजेचे आहे.
डेंगीच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी आयोजित बैठकीत मोहीमेचा तपशील जाहीर करण्यात आला. जबाबदार व्हा. स्वतःला आणि इतरांना शिक्षित करा. पीसीएमसी सारथीला सतर्क करा आणि पाणी साठवू देऊ नका. डेंगीला रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली.
सोशल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आधारे मोहिमेस व्यापक प्रसिद्धी दिली जाईल. नामांकित व्यक्तींतर्फे जनजागृती संदेश आणि बाईटस् यांचा समावेश असेल. गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांची मदत घेतली जाईल. मॉल्स, थिएटर आणि उद्यानांमध्ये जनजागृती व्हिडीओ दाखविण्यात येईल. ठिकठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहेत.
मोहिमेंतर्गत संपूर्ण आठवडाभर विविध क्षेत्रात उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये डास उत्पत्ती स्थळांची तपासणी करणे, आवाहनपत्रांचे वाटप करणे आणि मार्गदर्शक सूचनांच्या प्रसारासाठी बैठकांना उपस्थित राहणे यांचा समावेश असणार आहे. शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी डेंगी जागरूकता व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप चालू केली जाईल. डास उत्पत्ती स्थळांची तपासणी करणे, पोस्टर स्पर्धा, व्याख्याने आणि रॅली आयोजित करणे हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
प्रत्येक आठवडा एक दिवस आणि एक तास मोहीम नागरिकांच्या घरांभोवतालची डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरणार आहे. प्रत्येक रविवारी आपापल्या घरी आणि घराभोवतीच्या परिसरात स्वच्छता करून, पाण्याची डबकी नष्ट करावीत. कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.