विधानपरिषदेसाठी पिंपरीतून गोरखे?

पिंपरी प्रतिनिधी : विधानसभेतून विधानपरिषदेवर भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून पाठविण्यासाठी पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांच्या नावाची शिफारस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे केली आहे. त्यांच्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवी नाईक यांचाही समावेश आहे. त्यामुळे गोरखे यांना संधी मिळते का, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. दोन जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यापार्श्वभूमीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवला आहे. त्यामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांचा समावेश आहे.
गोरखे यांना संधी मिळाल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असून पक्षाला आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे. विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे एक असे भाजपचे तीन आमदार असून गोरखे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यास चार आमदार होतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अशी गोरखे यांची ओळख आहे.