Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
पिंपरी-चिंचवड

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग!

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग!

अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली;आगीमध्ये स्कूल बसचे नुकसान
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर चौक येथे आज गुरुवार (दि. 20) रोजी सकाळी १०:३३ दरम्यान एका खासगी शाळेच्या स्कूल बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

viara vcc
viara vcc

संबंधित स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परत येत असताना काळाखडक परिसराकडे जात होती. त्यावेळी बसमधून अचानक धूर बाहेर पडत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले असता तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी अग्निशमन केंद्रातील अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याची कार्यवाही सुरू केली. काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीमध्ये संबंधित स्कूल बसचे नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे. सदर घटनेच्या वेळी बसमध्ये विद्यार्थी नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही कार्यवाही अग्निशमन विभागाच्या लीडिंग फायरमन निखिल गोगावले, फायरमन गणेश मुसळे, फायरमन संकेत पारेकर, फायरमन दीपक कोठे, ट्रेनी सब ऑफिसर ज्ञानेश्वर हाके, ट्रेनी फायरमन प्रसाद बागेकरी आणि वाहनचालक संजय बिस्किटे यांच्या पथकाने पार पाडली.

वाहनांमधून धूर येणे, जळण्याचा वास येणे, वायरिंगमध्ये बिघाड होणे किंवा अन्य कोणतीही असामान्य बाब निदर्शनास आल्यास वाहन तात्काळ सुरक्षित ठिकाणी थांबवावे आणि आगीची शक्यता भासल्यास त्वरित अग्निशमन विभागाच्या १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाकडून यावेळी करण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"