भाजी विक्रेत्याने खंडणी न दिल्याने जीवे मारण्याची धमकी!

आळंदी : भाजीविक्रेत्याने पाच हजार रुपयांची प्रति महिना खंडणी देण्यास नकार दिल्याने त्यास लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवार आठ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ज्ञानसागर मंगल कार्यालयाच्या जवळ ,वडगाव रोड ,आळंदी येथे घडली.

या प्रकरणी सिद्धार्थ भीमराव डबडे (वय 60, रा. ज्ञानसागर मंगल कार्यालयाजवळ, वडगाव रोड, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरी ओम गणेश पांचाळ (रा. वडगाव रोड, आळंदी) व अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या भाजीपाला विक्रीच्या गाड्यावर येऊन आरोपींनी दरमहा पाच हजार रुपये हप्ता म्हणून खंडणीची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने सदर आरोपींनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. तसेच फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दुधमल तपास करत आहेत.

