पाणी कपात कायम ; मात्र जलतरण तलाव सुरु करण्याचे आदेश!

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अजब करभार
पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्यामध्ये ऑक्टोबर अखेरपर्यंत 15 टक्के पाणी कपात सुरूच राहणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सुचित केले असताना देखील शहरातील जलतरण तलाव मात्र सुरू करण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी दिल्याने शहरातील नागरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

गेल्या काही दिवसापासून शहरात आणि धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला आहे त्यामुळे पवना धरण 100% भरले असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी शहरातील जलतरण तलाव सुरू करावेत अशी मागणी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडे केली. त्यांनी देखील जेष्ठ नागरिकांची मागणी मान्य करण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांची भेट घेऊन जलतरण तलाव सुरू करण्याबाबतचे निवेदन दिले. सध्या शहरातील सर्व जलतरण तलाव बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक ,जलतरणपटू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे असा आरोप या जेष्ठ नागरिकांनी केला. जलतरण हा आरोग्य आणि व्यायामासाठी उपयुक्त असल्याने ज्येष्ठ नागरिकांकडून तलाव लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती असे सांगण्यात आले.
पवना धरण 100% भरले असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे .नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सर्व जलतरण तलावपूर्ववत सुरू करण्याची सूचना उपमहापौर बाबर यांनी अतिरिक्त आयुक्त जंगम यांच्याकडे केली. उपमहापौर बाबर यांच्या सूचनेची तात्काळ दखल अतिरिक्त आयुक्तांनी घेऊन त्यांनी उपायुक्त पंकज पाटील यांना शहरातील सर्व जलतरण तलाव तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक , जलतरणपटू आणि क्रीडाप्रेमी यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्याच आठवड्यात शहरातील संस्था, नागरीक, लोकप्रतिनिधी यांनी देखील शहरातील पाणी कपात उठवावी आणि पूर्ववत पाणीपुरवठा करावा अशी मागणी आयुक्त डॉक्टर विजय यांच्याकडे केली होती. अनेक नगरसेवकांनी देखील तशी मागणी केली. मात्र आयुक्तांनी त्यास नकार दिला. कारण पाटबंधारे विभागाने जाहीर केले होते की ऑक्टोबर अखेर धरणामध्ये शंभर टक्के पाणी असणे गरजेचे आहे, तरच भविष्यात शहरातील पाणीपुरवठ्याबाबत निर्णय घेता येईल, असे असताना देखील अतिरिक्त आयुक्त जंगम यांनी उपमहापौरांनी मागणी करताच तातडीने जलतरण तलाव सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश उपायुक्ततांना दिल्याबद्दल सर्वसामान्य नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
गेल्या सहा वर्षापासून शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना त्याची दखल मात्र घेतली जात नाही. जर शंभर टक्के धरण साठा असेल तर पंधरा टक्के पाणी कपात का उठवली जात नाही ?याचे उत्तर मात्र प्रशासन देणार का ?अशी चर्चा शहरात सुरू आहे.

