सायबर गुन्हेगारी टोळीला बँक खाते वापरण्यास परवानगी दिल्याने गुन्हा दाखल!

चाकण : देशभरातील सात नागरिकांची सायबर गुन्हेगारी टोळीच्या वतीने सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी आपल्या बँक खात्याचा वापर करण्यास परवानगी दिल्याने एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक ऑक्टोबर 2025 ते ३१ मार्च 2026 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

या प्रकरणी उमेश बळीराम कांबळे पोलीस शिपाई, चाकण उत्तर पोलीस ठाणे यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. किशन मनोज राजभर (रा. सदगुरूनगर ,नाणेकरवाडी ,चाकण ,ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने एक ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च 2026 दरम्यान चाकण हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खाते ओपन केले. या कालावधीत या खात्यावर एकूण 1 कोटी 23 लाख 73 हजार 561 रुपये रकमेचे आर्थिक व्यवहार करण्यात आले. भारतभरातील एकूण सात नागरिकांची सायबर गुन्हेगारी टोळीच्या वतीने सायबर फसवणुकीची रक्कम या खात्यावर स्वीकारण्यात आली. आरोपीने आपले बँक खाते सायबर गुन्हेगारी टोळीला व्यवहार करण्यासाठी परवानगी दिली आहे. उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम हे तपास करत आहेत.

