भाजप नगरसेवकाला दोन लाखाची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी!

सराईत गुन्हेगाराला अटक
पिंपरी :अतिक्रमण कारवाईत पान टपरीवर कारवाई केल्याचा राग मनात धरून भाजप नगरसेवकाकडे दोन लाखाची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. ही घटना जुनी सांगवी येथील वसंतदादा पुतळ्यासमोरील नदी घाट परिसरात घडली.

याप्रकरणी भगवान रविदास भिंगारे (मुळा नगर, जुनी सांगवी )यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भिंगारे हे भाजप नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगरसेवक हर्षल ढोरे, पराग महामुनकर आणि अमोल गायकवाड हे नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करत असताना आरोपी याने मोबाईल वरून हर्षल ढोरे यांना फोन केला. माझ्या पान टपरीवर तुमच्यामुळे कारवाई झाली. त्यामुळे माझे दोन वर्षापासून मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई म्हणून मला दोन लाख रुपये दे, अन्यथा माझ्याकडे पिस्तूल आणि गोळ्या आहेत तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी त्यांनी दिली.
आगामी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नदी घाटावर आवश्यक दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी फिर्यादी व त्यांचे सहकारी गेले असता आरोपी तेथे आला. हर्षल ढोरे कुठे आहे. आज त्याला सोडणार नाही. त्यांनी माझे वाटोळे केले आहे असे मोठमोठ्याने ओरडत त्याने परिसरात दहशत निर्माण केली .हे प्रकरण मिटवायचे असेल तर मला दोन लाख रुपये द्यावे आणि दर महिन्याला वीस हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर हर्षल ढोरे यांच्या जीवाचे बरे वाईट करीन अशी धमकी त्याने दिली. मी या भागातील भाई आहे आणि आत्ताच तडीपार होऊन आलो आहे. एकेकाला बघून घेतो असे म्हणत तिथून पोबारा केला. सांगवी पोलीस ठाण्याचे फौजदार पाटील हे तपास करत आहेत.

