फक्त मुद्द्याचं!

17th March 2026
पिंपरी-चिंचवड

गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लस महत्त्वाची!

गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लस महत्त्वाची!

बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडून लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट
पिंपरी : गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक असून योग्य वेळी घेतलेली एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लस हा या आजाराविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकतो, असे मत शहरातील प्रतिष्ठित बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पात्र मुलींना मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लसीकरण दिले जात आहे. म्हणजेच ०९ जून २०११ ते ०८ मार्च २०१२ या कालावधीत जन्मलेल्या मुली या लसीकरणासाठी पात्र आहेत.

या संदर्भात बोलताना ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. रविंद्र कदम म्हणाले की, “एचपीव्ही संसर्ग हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानला जातो. त्यामुळे मुलींना योग्य वयात एचपीव्ही लसीकरण देणे अत्यंत आवश्यक आहे. ही लस सुरक्षित असून भविष्यात गंभीर आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी ती प्रभावी ठरते.”

लसीच्या समाजातील गैरसमजाबद्दल बोलताना ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश ढेकणे म्हणाले की, “एचपीव्ही लसीकरणाबाबत गैरसमज समाजात आढळून येतात. मात्र ही लस पूर्णपणे सुरक्षित असून योग्य वयात घेतल्यास गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत होते. त्यामुळे पालकांनी मुलींच्या आरोग्यासाठी लसीकरणाला प्राधान्य द्यावे.”

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत १४ वर्षे पूर्ण झालेल्या पण १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना मोफत एचपीव्ही लस दिली जात आहे. तसेच सर्व लाभार्थ्यांची नोंद यू-विन (U-WIN) पोर्टलवर करण्यात येत आहे. शहरातील अधिकाधिक मुलींना या मोहिमेचा लाभ मिळावा यासाठी वैद्यकीय विभागामार्फत जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

१४ वर्षे वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण दिल्यास भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. ही लस वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित असून पालकांनी कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता पात्र मुलींना मनपा रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी आणावे ही विनंती. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"