सर्वांना आनंद देणे अतिशय महत्त्वाचे: शोभा जोशी

तेरावे समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न
पिंपरी : सर्वांना आनंद देणे अतिशय महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून ही वृत्ती आचरणात आणावी असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिका शोभा जोशी यांनी खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे मंगळवार, दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी केले. समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आयोजित तेराव्या एकदिवसीय समरसता बालकुमार विद्यार्थी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जोशी बोलत होत्या.

स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश गोरडे होते. तसेच महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, डॅा. नीता मोहिते, व्याख्याते प्रा. दिगंबर ढोकले, नितीन बारणे, मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे, समरसता साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्षा मानसी चिटणीस यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ढोलताशांच्या गजरात पारंपरिक वेषभूषेतील विद्यार्थ्यांनी मान्यवरांसह उत्साहात ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ केला; तर औक्षण, शिवगर्जना, अनुष्का चिटणीस या युवतीने सादर केलेली गणेशवंदना, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, सरस्वतीस्तवन करून उद्घाटन सत्राचा प्रारंभ करण्यात आला. मानसी चिटणीस यांनी प्रास्ताविकातून, ‘विद्यार्थ्यांची साहित्यरुची वृद्धिंगत व्हावी म्हणून तेरा वर्षांपासून विविध संकल्पना केंद्रस्थानी ठेवून संमेलनाचे आयोजन केले जाते.अशी माहिती दिली.
ॲड. सतीश गोरडे यांनी,सामाजिक समरसता स्थापित व्हावी हा भारतीय संविधानाचा उद्देश समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन अधोरेखित करीत आहे. असे मत व्यक्त केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी, ‘विद्यार्थ्यांनी भावी काळात देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे कार्य करावे’असे आवाहन केले. जयश्री श्रीखंडे यांनी सत्राचे आभार मानले.
विवेकानंद सुतार यांच्या अध्यक्षतेखाली सद्भावना सत्रात श्रावणी चिलखे (सावित्रीबाई फुले), कार्तिकी गाडे (राजमाता जिजाऊ), शिवम तोडकर (सुभाषचंद्र बोस), सिओन सरोदे (स्वामी विवेकानंद) या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेषभूषेत त्यांच्या विचारांचे सादरीकरण केले; विवेकानंद सुतार यांनी, ‘आपल्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तींशी सद्भावनेने वागा!’ असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. देवयानी इंगळे या विद्यार्थिनीने सत्राचे सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ साहित्यिका संगीता पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बाल कविसंमेलनाचा प्रारंभ कृष्णा खिल्लारे आणि सहकारी या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोवाड्याने झाला. सुप्रिया ठोसर, धनश्री हजारे, दीक्षा सरोदे, गीता निर्मळ, अंकिता धीवर, भूमिका खंडागळे, रूपाली तायड, भूमी मोरे या विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले; तर हर्षवर्धन गाडेकरने गोष्ट सांगितली.
राजन लाखे यांनी वेगवेगळी उदाहरणे आणि काव्यपंक्ती उद्धृत करीत साहित्यिक गप्पा या सत्रांतर्गत विद्यार्थ्यांशी हितगुज करताना कवितालेखनाची प्रक्रिया समजावून सांगितली. तसेच लेखनापूर्वी भरपूर वाचन करा, यशस्वी होण्यासाठी अथक कष्ट करा, असा कानमंत्र दिला. केतन सांगडे या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन केले;. तर कथाकथन सत्रात मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली रुद्रांग धुमाळ, वैष्णवी कांबळे, मानसी पाटील, सियारा सरोदे, आलिया शेख या विद्यार्थ्यांनी कथाकथन केले. अश्विनी बाविस्कर यांनी दोन रंजक कथा सांगून आपल्या वाचिक अभिनयाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मूकाभिनयातून म्हणी ओळखणे या खेळाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रुद्र कदम या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन केले.
समारोप सत्रात नगरसेविका शालिनी गुजर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. आकाश गुजर, कुमुदिनी घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती स्मिता कुलकर्णी यांनी उद्घाटन आणि समारोप सत्रांचे सूत्रसंचालन केले; सुहास घुमरे यांनी आभार मानले. सामुदायिक वंदे मातरम् ने संमेलनाचा समारोप करण्यात आला.

