महाळुंगे, शिरगाव आणि चाकण परिसरातील हातभट्ट्यांवर पोलिसांचे छापे!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कक्षेतील महाळुंगे, शिरगाव आणि चाकण परिसरातील हातभट्ट्यांवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हातभट्टी साठी लागणारे रसायन आणि दारू असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा साठा नष्ट केला.

शिरगाव मध्ये पवना नदीकाठी हातभट्टीची दारू तयार करण्याच्या उद्देशाने भिजत घातलेले 5000 लिटर गुळमिश्रित रसायन पोलिसांनी कारवाई करत नष्ट केले. ही कारवाई गुरुवार आठ जानेवारी रोजी करण्यात आली. शिरगाव येथील सुरेश गायकवाड यांच्या शेताजवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिलीप विश्वनाथ राठोड यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गोणवाडी भाम नदीकाठी गावठी दारू तयार करण्यासाठी नदीपात्राजवळ भिजत घातलेले तीस हजार रुपये किमतीचे सहाशे लिटर रसायन गुन्हे शाखेच्या पथकाने नष्ट केले. ही कारवाई बुधवार सात जानेवारी रोजी गुणवडी गावच्या स्मशानभूमी जवळ करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई सुधीर शिवाजी दांगट यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जीवन मारुती राजपूत रा. गोणवडी, ता. खेड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
चाकण परिसरात एका शेतातील अंबिका प्लॅस्टिक मध्ये बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्यासाठी साठवलेले एक लाख रुपये किमतीचे दोन हजार लिटर कच्चे रसायन पोलिसांनी छापा टाकून नष्ट केले. ही कारवाई गुरुवार आठ जानेवारी रोजी साबळेवाडी गावचे हद्दीत करण्यात आली. एका महिला आरोपीवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुसाणे गावात हिरामण येवले यांच्या शेतालगत नदीकाठी अवैध दारू निर्मितीसाठी साठवलेले छप्पन हजार रुपये किमतीचे 1600 लिटर गुळमिश्रित रसायन पोलिसांनी जप्त केले. मागील दोन दिवसांपासून पोलिसांनी विविध गावठी दारू हातभट्टयांवर छापे टाकले आहेत.

