लोकशाहीच्या ज्वालेला प्रज्वलित करणारी अग्निशमन विभागाची मतदान जनजागृती रॅली!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत करण्यात आले आयोजन
पिंपरी : सायरनचा आवाज, लाल रंगाची धावती वाहने आणि लोकशाहीचा संदेश… या अनोख्या संगमातून पिंपरी चिंचवड शहरात आज अग्निशमन विभागाची मतदान जनजागृती रॅली उत्साहात पार पडली. या रॅलीच्या माध्यमातून ज्वाला विझवणाऱ्या हातांनी आज लोकशाही प्रज्वलित करीत मतदानाचा संदेश दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही मतदान जनजागृती रॅली शहरात लक्षवेधी ठरली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती उपक्रम शहरातील विविध भागांत राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत आज महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.
निगडी येथील भक्ती शक्ती चौकातून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अग्निशमन विभागाचे जवान व नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये अग्निशमन विभागाच्या एकूण १४ अत्याधुनिक वाहनांचा समावेश होता. यामध्ये ५ देवदूत वाहने, ५ फायर बाईक, १ इसुझू वाहन, १ वॉटर मिस्ट, १ एएलपी (ALP) तसेच १ वॉटर ब्राऊझर यांचा समावेश होता. या सर्व वाहनांवर मतदान जनजागृतीचे संदेश झळकत होते. यावेळी ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…’, ‘मतदान हा तुमचा अधिकार आहे…’, ‘येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीत नक्की मतदान करा…’ अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
पथनाट्य, फ्लॅश मॉबचे सादरीकरण
पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये या मतदान जनजागृती रॅलीचा समारोप झाला. याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, सीताराम बहुरे, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांसाठी मतदान जनजागृती पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच फ्लॅश मॉबद्वारे प्रभावी संदेश देण्यात आला. पंकज सोनी, ऋतुजा खामकर, ईशा दहिवाळ, भूमी पलांडे, स्वरा परभाणे, काव्या पाटील, संचिता कांबळे यांनी फ्लॅश मॉबचे सादरीकरण केले.

