दुकानातील पावणेतीन लाखाची चोरी; एकास अटक

पिंपरी : दुकानाचे पाठीमागील पत्रे उचकटून आत प्रवेश करत चोरट्यांनी दोन लाख 72 हजार रुपये किमतीचा तांब्याचा माल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे .हा प्रकार काळेवाडी ज्योतिबा गार्डन परिसरातील बालाजी ट्रेडर्स या दुकानात घडला. राहुल पांडुरंग इगवे (वय 25, लिंक रोड ,परिवर्तन सोसायटी पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अमर शंकर दूशेचा (वय 23, रा. विजयनगर ,काळेवाडी) यांनी शनिवारी सहा डिसेंबर रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या दुकानाच्या मागील बाजूस असलेला पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला .त्यानंतर त्याने दुकानातील दोन लाख 72 हजार रुपये किमतीचा तांब्याचा माल चोरून नेला. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलाकडे देशी पिस्तूल सापडले!
पिंपरी :अल्पवयीन मुलाकडे देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुस आढळून आले. ही कारवाई शनिवार सहा डिसेंबर रोजी सकाळी चिंचवड येथे करण्यात आली. पोलिस अमलदार लक्ष्मीकांत पतंगे यांनी सहा डिसेंबर चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचवड येथील उड्डाण पुलाजवळ संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व पाचशे रुपये किमतीचे जिवंत काडतुस मिळून आले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

