Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

7th July 2026
पिंपरी-चिंचवड

जूनमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ४७ हजार ७६६ टन कचऱ्याचे संकलन!

जूनमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ४७ हजार ७६६ टन कचऱ्याचे संकलन!

कचरा विलगीकरणास नागरिकांचा वाढता प्रतिसाद
पिंपर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून जून महिन्यात शहरातून एकूण तब्बल ४७ हजार ७६६.७८५ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. स्त्रोत पातळीवर कचऱ्याचे विलगीकरण, स्वतंत्र संकलन आणि वैज्ञानिक प्रक्रियेला दिलेल्या प्राधान्यामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक होत असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

viara vcc
viara vcc

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात ३५ हजार २३.६०० टन सुका कचरा, ६ हजार ७३१.३२० टन ओला कचरा, ४ हजार ९७.८५० टन मिश्र कचरा, १ हजार ११८.२२५ टन ग्रीन वेस्ट, ४७९.२२५ टन चिकन वेस्ट आणि ३१६.५६५ टन मंडई वेस्ट संकलित करण्यात आला. संकलित कचऱ्यावर विविध प्रक्रिया केंद्रांमध्ये वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून पुनर्चक्रीकरण तसेच वसुंधरापूरक व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे लँडफिलवरील ताण कमी होण्यासह नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनालाही चालना मिळत आहे.

महापालिकेने घराघरांतून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी सातत्याने जनजागृती मोहीम राबविली आहे. त्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, कचरा विलगीकरणाचे प्रमाण वाढल्याने कचऱ्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी होत आहे. त्याचबरोबर ग्रीन वेस्ट, मंडई वेस्ट आणि इतर विशेष प्रकारच्या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन केल्यामुळे पर्यावरणपूरक घनकचरा व्यवस्थापनाला बळ मिळत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, “घनकचरा व्यवस्थापन ही केवळ स्वच्छतेची बाब नसून पर्यावरण संवर्धनाशी निगडित महत्त्वाची जबाबदारी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्चक्रण आणि वैज्ञानिक प्रक्रिया यावर सातत्याने भर दिला जात आहे. नागरिकांनी कचरा विलगीकरणाची सवय अधिक प्रभावीपणे अंगीकारल्यास ‘झिरो वेस्ट सिटी’चे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल आणि भावी पिढ्यांसाठी अधिक स्वच्छ व हरित शहर निर्माण करता येईल.

महापालिकेने नागरिकांना घरातूनच ओला, सुका तसेच सॅनिटरी कचरा, विशेष काळजी योग्य कचरा अशा चार प्रकारे कचरा विलग करूनच महापालिकेच्या घंटागाडीत देण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, हरित आणि शाश्वत शहर घडविण्याच्या दिशेने सातत्याने प्रगती करत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"