मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 76 टक्के क्षमतेने भरले!

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 76 टक्के क्षमतेने भरले आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.

धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात मोठ्या प्रमाणात येवा येत आहे. पुढील काही तासांत धरणाची पाणीपातळी 80% पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार कधीही धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
कासारसाई धरण
कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने येवा वाढत आहे. कासारसाई धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करणेसाठी पहाटे ५.४५ वाजता कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात सुरु असणारा ३१७० क्युसेक्स इतका विसर्ग वाढवून ४१९४ क्युसेक्स करण्यात येणार आहे. पाऊस वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल.
नागरिकांना आवाहन
कोणीही नदीपात्रात उतरू नये. 2. नदीपात्रात असलेले साहित्य, वाहने व जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. 3. मुठा नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे.धरणातून विसर्ग सुरू झाल्यास पुण्यातील डेक्कन, सिंहगड रोड, वारजे, विठ्ठलवाडी, बाणेर-बालेवाडी भागातील नदीकाठच्या परिसरात पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 1077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

