एनडीएत पोहण्याच्या सरावावेळी छात्राचा मृत्यू!

पुणे : खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीतील ( एनडीए ) छात्राचा पोहण्याच्या सरावावेळी गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. आदित्य यादव (वय 18 ) असे छात्राचे नाव असून एनडीएतील छात्राच्या मृत्यूची ही याच महिन्यातील दुसरी घटना आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क विभागाने या घटनेची माहिती प्रसिद्धी पत्राकाद्वारे दिली आहे. गुरुवार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एनडीए मध्ये पोहण्यात सक्षम नसलेल्या छात्रांसाठी प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सराव सत्र सुरू होते. त्यावेळी अचानक आदित्य यादव पाण्याच्या पृष्ठभागावर निश्चल अवस्थेत आढळला. ही बाब लक्षात येताच दोन जीव रक्षकांनी तात्काळ पाण्यात उडी घेत आदित्यला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याला त्वरित कृत्रिम श्वासोच्छ्वास सीपीआर देऊन आणि लष्करी रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले .मात्र सर्व प्रयत्न करूनही आदित्यला वाचवता आले नाही .या घटनेची माहिती स्थानिक पोलीस तसेच आदीत्यच्या कुटुंबातील निकटवर्ती यांना देण्यात आली असून घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी औपचारिक चौकशी करण्याचे आदेश एनडीए प्रशासनाने दिले आहेत .

