चऱ्होलीची प्रस्तावित TP स्कीम अखेर रद्द;भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय!

आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चऱ्होली येथे प्रस्तावित TP स्कीम अखेर रद्द केली आहे. प्रशाससनाने आज तशी घोषणा केली आणि आगामी सर्वसाधारण सभेत त्या प्रस्तावाला मंजुरी देऊन ‘नोटिफिफकेशन’ काढण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांच्या एकजुटीचा विजय झाला असून, भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश मिळले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासनाने मौजे चिखली आणि चऱ्होलीसह शहरातील काही गावांमध्ये TP स्कीम राबवण्याची योजना आखली होती. स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांना विश्वासात न घेता ही Scheme लादण्याचा प्रयत्न सुरू होता. या TP Scheme ला तीव्र विरोध करण्यात आला.

दरम्यान, भाजपा आमदार महेश लांडगे यांनी भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी या TP स्कीम विरोधात रान पेटवले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासोबत तीन बैठका घेतल्या. शहराच्या स्थापनेपासून भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे. सुरूवातीला एमआयडीसीए, त्यानंतर नवनगर प्राधिकरण आणि महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतरही विविध आरक्षणांसाठी शेतकऱ्यांच्या जमीनी घेतल्या आहेत. आता TP स्कीमच्या माध्यातून शेतकरी भूमिहीन होतील. त्यामुळे आमचा TP स्कीम ला तीव्र विरोध आहे. तसेच, संपूर्ण शहराचा सुधारित विकास आराखडा (DP) तयार होत असताना TP स्कीम चा आग्रह कशासाठी? असा प्रश्नही आमदार लांडगे यांनी उपस्थित केला होता.
भूमिपुत्रांची एकजुट आणि आमदार महेश लांडगे यांची साथ यामुळे मौजे चिखली येथील TP स्कीम रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. त्यानंतर मौजे चऱ्होलीची TP स्कीम रद्द करण्यासाठी महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांची बैठक झाली आणि शुक्रवारी, दि. 30 मे रोजी चऱ्होली बंदची हाक दिली होती. माजी महापौर नितीन काळजे, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांच्यासह ग्रामस्थांनी वज्रमुठ बांधली होती. विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपुत्रांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल, अशी मागणीही केली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नमते घेतले आणि चऱ्होलीची TP स्कीम रद्द करण्यात येणार आहे.
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मौजे चऱ्होली येथील प्रस्तावित TP स्कीम सुरू केलेल्या प्रक्रियेला स्थगिती दिली. भूमिपुत्र आणि आमदार महेश लांडगे यांनी सदर TP स्कीम ला विरोध केला आहे. त्यामुळे प्रक्रिया स्थगित करीत आहोत. तसेच, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन TP स्कीम रद्द बाबत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.
माझ्या गेल्या 20 वर्षांतील सामाजिक व राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू म्हणून पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्र राहीला आहे. त्यामुळे भूमिपुत्रांच्या हिताबाबत कोणतीही तडजोड नाही, अशीच माझी भूमिका आहे. चिखली आणि चऱ्होली दोन्ही गावातील TP स्कीम रद्द झाली. तसे नोटिफिशेन लवकरच काढण्यात येईल. महानगरपालिका प्रशासनाचे मनापासून आभार मानतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पाठबळ दिले. शास्तीकर सरसकट माफी असो, प्राधिकरण परतावा आणि बफर झोन रद्द करण्यासारखे निर्णय भाजपा महायुती सरकारने घेतले. या पुढील काळातही भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी कायम आग्रही राहणार आहे. -महेश लांडगे, आमदार, भाजपा

