पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने आयोजित केलेल्या स्पर्धेतअजित दादांचे फोटो!

पिंपरी : पिंपरीत शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फोटो लावल्याने चर्चा रंगली आहे. त्याला कारण ही तसंच आहे. पिंपरी चिंचवडमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मोरेश्वर भोंडवेंनी आयोजित केलेल्या स्पर्धेत शिवसेनेच्या नेत्यांऐवजी अजित दादांचे फोटो झळकलेत. चिंचवड विधानसभा लढण्याच्या हेतूने मोरेश्वर भोंडवेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, ठाकरेंनी तिकीट नाकारलं आणि भोंडवेंनी घुमजाव करुन घरवापसी केली.
चिंचवड विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी अजित दादांच्या सल्ल्यानेच मशाल हाती घेतली होती आणि महाविकास आघाडीत राहून महायुतीच्या शंकर जगतापांना आमदार केलं होतं, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करताना भोंडवेंनी अजित दादांना अडचणीत आणणारा दावा करुन टाकला. त्यानंतर आता अजित दादांनी मला राष्ट्रवादीत सामावून घेतलं आहे, त्यामुळं मला पक्षप्रवेशाची गरज नाही. मी आगामी महापालिका निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढणार असल्याचं ही स्वतः मोरेश्वर भोंडवेंनी जाहीर करून टाकलं आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेच्या मैदानात अजित पवारांचे फोटो लावून त्या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्याने चर्चा सुरू आहेत.
‘अजित दादा पहिल्यापासून आमचे दैवत आहेत. मी अजित दादा यांच्यात पक्षात आहे. दादांना चिंचवड विधानसभेमध्ये जागा नव्हती म्हणजे बीजेपीसाठी सोडली होती, त्यामुळे मी दादांना सांगितलं की, मी जरा पर्याय शोधतो. दादांना विचारून मी हे सगळं केलेला आहे. दादा म्हणाले तुम्हाला हवा तो निर्णय घ्या. आता मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात आहे. आमच्या पक्षात एखाद्यावेळी एखाद महिना इकडे तिकडे गेला तरी फरक पडत नाही, विधानसभेवेळी दादांनी मला फोन केला होता, आता तुला तिकीट भेटलं नाही. तर शंकर जगताप यांना सहकार्य कर, त्याप्रमाणे मी त्यांना सहकार्य केलं.