फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग तातडीने हटवावे : आयुक्त शेखर सिंह

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग तातडीने हटवावे : आयुक्त शेखर सिंह

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री आदी साहित्य तातडीने हटवावे, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री आदी विरुद्ध योग्य कार्यवाही करण्याबाबत पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९९५ चे कलम ३ तसेच महाराष्ट्र अधिनियमातील कलम २४४ (१) (२) (३), २४५(१) (२) आणि महानगरपालिका आकाशचिन्ह तसेच जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण करणारे नियम दिनांक ९ मे २०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार तरतुदी निर्गमित करण्यात आल्या असून या नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स गॅन्ट्री आदी उभारण्यात आले असल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

या बैठकीस उपस्थित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आयुक्त शेखर सिंह यांनी विविध सूचना दिल्या, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स गॅन्ट्री आदी विरुद्ध संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी योग्य कार्यवाही करावी. तसेच पर्यवेक्षणासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपआयुक्त यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहावे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स गॅन्ट्री आदी अनधिकृत बाबींना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांची एक समिती संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी गठीत करावी, तसेच याबाबत व्यापक जनजागृती करावी, अनधिकृत रित्त्या उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकावर प्लास्टिक किंवा इतर अविघटनशील पदार्थाचा वापर केला असल्यास संबधितांवर क्षेत्रीय अधिकारी यांनी योग्य कार्यवाही करावी, महापालिकेद्वारे संबंधित कार्यक्षेत्रामध्ये नविन जाहिरात फलक उभारणे तसेच पुर्वी दिलेल्या जाहिरात फलकाचे नुतनीकरण केले जाते. याबाबतचे प्रस्ताव संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे दाखल केले जातील त्यावर संबंधित परवाना निरीक्षक स्थळपाहणी करून क्षेत्रीय अधिकारी स्थळ पाहणी अहवाल सादर करतील त्यानुसार प्रस्तावाची तपासणी करून क्षेत्रीय अधिकारी यांनी स्वयंस्पष्ट अभिप्रायासह प्रस्ताव आकाशचिन्ह व परवाना विभागप्रमुखांकडे मंजुरीसाठी सादर करावे असे आयुक्त सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या कमानी, मंडप, झेंडे, फलक याबरोबरच खाजगी तथा मार्वजनिक जागेवर लावण्यात आलेले अनाधिकृत जाहिराती, घोषणा फलक, फ्लेक्स, पोस्टर, किऑक्स, गॅन्ट्री आदीवावत मंबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी उचित कार्यवाही करावी, अशा सर्व कार्यवाहीचे फोटोग्राफी, चित्रीकरण व पंचनामे करून ते संग्रही ठेवावे, आदी सूचना आयुक्त सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शहरातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स गॅन्ट्री आदीबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक ८८८८००६६६६, एस एम एस आणि व्हॉटस अॅपसाठी ९८२३११८०९० हा क्रमांक असून सारथी हेल्पलाईन ०२० – ६७३३३३३३ किंवा ०२०- २८३३३३३३ या द्वारे नागरिक तक्रार दाखल करू शकतात. तसेच छायाचित्रासह तक्रार दाखल करण्यासाठी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"