भीषण आगीत चिखलीतील गोडाऊन खाक

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरामध्ये पुन्हा एकदा गोडाऊनला भीषण आग लागली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची ९ वाहने घटनास्थळी पोहोचली आहेत. काही किलोमीटर अंतरावरून धुरांचे लोट दिसत असल्याने ही आग मोठी आहे, असा अंदाज आहे.
चिखलीमध्ये नेहमीच आगीच्या घटना घडतात. आज सकाळी दहाच्या सुमारास चिखली-कुडाळवाडी येथे गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण नऊ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दल करत आहेत.
चिखलीमध्ये मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसाय आणि गोडाऊन असल्याने त्या ठिकाणी नेहमीच आग लागते. यावर महानगरपालिकेने कायमचा तोडगा काढणे देखील गरजेचे आहे. कारण आजूबाजूला नागरी वस्ती आहे. अनेक नागरिक हे चिखली परिसरात राहतात. या आगीच्या धुरापासून त्यांच्या आरोग्याला धोकादेखील उद्भवू शकतो हे नाकारता येत नाही. चिखलीत अनेक अनाधिकृत गोडाऊन आहेत. भंगार व्यावसायिकांवर कारवाई करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. अनाधिकृत आणि बेकायदेशीर गोडाऊनवर कडक कारवाई होत नाही.