फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

स्वच्छ आणि सुंदर शहर नकोच का?

स्वच्छ आणि सुंदर शहर नकोच का?

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचे अनधिकृत फलकांवरील कारवाईला टाळाटाळ

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड हे दिवसेंदिवस आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना शहरातील अनधिकृत फलकांमुळे परिसराचे अक्षरशः विद्रुपीकरण होत आहे. पण पालिका प्रशासन कारवाईसाठी टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात ठिकठिकाणी अनधिकृत फ्लेक्स उभारल्याचे आढळून येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालानंतर विजयी उमेदवारांचे आणि क्वचित काही ठिकाणी पराभूत उमेदवारांचे देखील फ्लेक्स झळकत आहेत. त्यासाठी पालिका प्रशासनाकडून परवानगी घेतल्याची नोंद नाही. कारण, शहरात केवळ एक हजार ३०० होर्डिंग अधिकृत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. प्रत्यक्षात त्याहून अधिक फ्लेक्स व होर्डिंग आढळून येत आहेत.

होर्डिंग धारकांनी नियमांचे पालन करावे. अन्यथा, एखादी दुर्घटना घडल्यास संबंधित होर्डिंग धारक आणि एजन्सीला जबाबदार धरण्यात येईल. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. प्रत्यक्षात त्याची कार्यवाही होत नसल्याचे ठिकठिकाणच्या फ्लेक्सच्या संख्येवरून दिसून येत आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर फ्लेक्सबाजीला ऊत आला आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा निर्माण होऊन विद्रुपीकरण होऊ लागले आहे.

फ्लेक्सची स्पर्धाच जणू..
शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी, चिखली, चऱ्होली, तळवडे, दिघी, रावेत, वाकड, किवळे, थेरगाव, पिंपळे सौदागर, सांगवी, पिंपळे गुरव या प्रमुख ठिकाणच्या मुख्य चौकांमध्ये फ्लेक्स उभारण्याची स्पर्धा दिसून येत आहे. नेत्यांचे विजयी बॅनर, वाढदिवसाच्या शुभेच्छा तसेच काही ठिकाणी जाहिरातबाजी यामुळे चौक झाकोळले आहेत. काही व्यावसायिकांच्या दुकानांसमोर कायमच फ्लेक्स लागल्यामुळे त्यांना व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. ते तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहे. तक्रार करूनही उपयोग होत नाही. स्थानिक कार्यकर्त्यांच्या दमबाजीची टांगती तलवार काही व्यावसायिकांच्या कायम डोक्यावर आहे.

जाहिरातींचे प्राइम स्पॉट
निगडी, यमुनानगर परिसरात झाडांवर खिळे ठोकून जाहिरातींचे फलक लावलेले आढळून येतात. याविषयी पर्यावरणप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. या झाडांना मोठे फ्लेक्स बांधलेले असतात. तर कित्येक ठिकाणी खिळे ठोकून फलक लावण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे झाडांना इजा तर होतेच शिवाय शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत असल्याची बाब पर्यावरणप्रेमींनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्रशासकीय यंत्रणेने काटेकोर अंमलबजावणी केली. मात्र, आचारसंहिता संपुष्टात येताच सर्वत्र अनधिकृत फ्लेक्सचे जाळे निर्माण झाल्याचे चित्र आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रात नियमबाह्यरित्या लावलेले फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग, चिन्ह, वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे, भिंतीवरील राजकीय जाहिराती ताबडतोब काढल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातालाही संबंधित राहतील जबाबदार
या संदर्भात महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले की, होर्डिंग धोरणाच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या अनधिकृत होर्डींग धारकांवर कडक कारवाई केली जाईल. अपघाताला संबंधितांना जबाबदार धरले जाईल.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"