तुमचा अभिप्राय ठरवणार पिंपरी चिंचवड शहराची ओळख!

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ साठी नागरिकांनी अभिप्राय द्यावा महापालिकेचे आवाहन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत शहराला अव्वल क्रमांक मिळवून देण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अभिप्राय देण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहा. आयुक्त किरणकुमार मोरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

शहराची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांचा सहभाग या घटकांवर आधारित या सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहराने उत्कृष्ट कामगिरी करावी, यासाठी महापालिका विविध स्तरांवर प्रयत्न करत आहे.
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणात शहरांचे मूल्यमापन कचरा विलगीकरण, कचरा संकलन, कचरा प्रक्रिया, स्वच्छता सुविधा आणि नागरिकांचे समाधान या निकषांवर केले जाते. त्यामुळे नागरिकांनी दिलेला अभिप्राय हा शहराच्या रँकिंगसाठी अत्यंत निर्णायक ठरतो.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात घरोघरी कचरा संकलन, स्वच्छता जनजागृती तसेच विविध उपक्रम राबविले जात आहेत. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती केली जात असून, शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
नागरिकांनी आपला अभिप्राय असा नोंदवावा
https://cf.sbmurban.org/
अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
आपला मोबाईल नंबर नोंदवा.
राज्य – महाराष्ट्र, जिल्हा – पुणे, ULB – पिंपरी चिंचवड निवडा.
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर टाकून फॉर्म सबमिट करा.
महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहराला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडत अभिप्राय नोंदवावा.
तर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी नागरिकांचा अभिप्राय अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने अंतिम मुदतीपूर्वी आपला सहभाग नोंदवावा.

