Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

26th October 2026
पिंपरी-चिंचवड

मोशी–चऱ्होली–चिखली परिसरात उभारणार ‘नाना पाटेकर नाट्यगृह’?

मोशी–चऱ्होली–चिखली परिसरात उभारणार ‘नाना पाटेकर नाट्यगृह’?

कला – सांस्कृतिक केंद्रासाठी आमदार महेश लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी मोशी–चऱ्होली–चिखली या वेगाने विकसित होणाऱ्या निवासी पट्ट्यात दिवंगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने भव्य नाट्यगृह आणि बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी योग्य जागा निश्चित करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, अशी विनंती त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि विस्तार झपाट्याने वाढत असताना मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त सभागृहाची आवश्यकता निर्माण झाली आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचाच्या धर्तीवर शहरात मोठ्या आसनक्षमतेचे नाट्यगृह उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर या मागणीला ठोस प्रकल्पाचे स्वरूप देऊन प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, अशी भूमिका लांडगे यांनी मांडली आहे. याबाबत सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.

मोशी, चऱ्होली आणि चिखली परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहत असून नागरिकांची वस्ती वाढत आहे. या भागातील नागरिक, कलाकार, नाट्यसंस्था, शाळा आणि महाविद्यालयांना नाट्यप्रयोग, संगीत मैफिली, साहित्य संमेलने, व्याख्याने तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या प्रस्तावामागील प्रमुख उद्देश आहे.

आधुनिक सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेवर भर…
प्रस्तावित प्रकल्पात प्रशस्त रंगमंच, दर्जेदार ध्वनी व प्रकाशयोजना, कलाकारांसाठी स्वतंत्र कक्ष, सरावासाठी जागा, लघु कार्यक्रमांसाठी सभागृह, दिव्यांगसुलभ प्रवेशव्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा सुविधांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुरेसे वाहनतळ, सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थापन यांचा जागा निश्चित करतानाच विचार करावा, असेही लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे. संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन जागा निश्चिती आणि प्रकल्प अहवालाची कार्यवाही तातडीने सुरू करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"