महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे पुण्यातील सहा प्रादेशिक अधिकारी निलंबित!

आर्थिक देवाणघेवाण उघड
पुणे : कथित आर्थिक देवाण-घेवाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुण्यातील कार्यालयातील सहा वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उद्योगांशी संबंधित परवाने देताना ही देवाण-घेवाण झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
उद्योगांना उभारणी (सीटीई )आणि संचालनासाठी (सीटीओ) परवानगी देण्याच्या प्रक्रियेत कथित आर्थिक देवाण-घेवाण केल्याप्रकरणी या सहा वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बाबासाहेब कुकडे उपप्रादेशिक अधिकारी, नवनाथ अवताडे उपप्रादेशिक अधिकारी, कार्तिकेय लंगोटे क्षेत्रीय अधिकारी, सुषमा कुंभार क्षेत्रीय अधिकारी, जयंत डोके आणि क्षेत्रीय अधिकारी अजय खामकर या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

उद्योगांना परवानग्या देण्याच्या मोबदल्यात झालेल्या कथित आर्थिक व्यवहारांच्या तक्रारीसोबत व्हिडिओ पुरावे सादर करण्यात आले होते. संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासे मागवण्यात आले. मात्र हे खुलासे असमाधानकारक असल्याचे सांगत सक्षम प्राधिकार्यांनी ते फेटाळून लावले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांकडून देवाण-घेवाण केली जाते अशा अनेक तक्रारी दिल्या गेल्या होत्या. परंतु आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आली नव्हती. कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तनाचा ठपका ठेवत सर्व सहा अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीच्या आधीन राहून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. निलंबनाच्या काळात संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यालय मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात निश्चित करण्यात आले आहे. नियंत्रण अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात म्हटले आहे.
शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरी प्रकरणात (एसीबी) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून जोरदार कारवाया सुरू असल्याने प्रशासकीय वर्तुळातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुण्यातील कार्यालयातून माहिती आली आहे. एकाच वेळी सहा अधिकाऱ्यांवर निलंबन करण्याच्या कारवाईचा बडगा उभारण्यात आल्याने शासकीय अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव या एमआयडीसी मधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या गेल्या आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या तक्रारी कचऱ्याच्या टोपलीत टाकून आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. रसायन मिश्रीत पाणी थेट नाल्याद्वारे नदीत सोडले जाते. त्यामुळे पवना, मुळा, मुठा, इंद्रायणी या नद्यांची गटारगंगा झाली आहे. यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार आहे.

