आचारसंहितेमुळे महापालिका पदाधिकाऱ्यांची वाहने घेतली काढून!

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक
पिंपरी : पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेत 27 ऑक्टोबर पर्यंत निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महापौर रवी लांडगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची वाहने महापालिका प्रशासनाने काढून घेतली आहेत. आचारसंहितेमुळे सर्वसाधारण सभा. स्थायी समिती व इतर विषय समितींच्या सभेचे कामकाज होणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

निवडणूक आयोगाने मंगळवार 22 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेत पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. तेव्हापासून पालिकेत निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे .त्यामुळे महापालिका नगरसचिव विभागाने महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे आणि विविध विषय समितींच्या सभापती तसेच क्षेत्रीय समिती अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्यात आली आहेत.

आचार संहिता लागू झाल्यामुळे महापालिकेच्या कोणत्याही सभेत ठोस निर्णय घेतले जाणार नाहीत. त्यामुळे 27 ऑक्टोबर पर्यंत महापालिकेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याच्या तहकूब सर्वसाधारण सभेतील स्वीकृत नगरसेवकांची निवड पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

