रावेत–नऱ्हे ‘डीपीआर’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हिरवा कंदील!

रावेत–नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाला लवकर सुरुवात
पिंपरी : रावेत ते नऱ्हे या 32 किलोमीटरच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत पुणे-शिरुर उन्नत द्रुतगती महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग आणि हडपसर-यवत उन्नत महामार्गांचे भूमिपूजन केले यावेळी या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांची संख्या आणि पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने होणारा विस्तार यामुळे रावेत ते नऱ्हे हा एलिव्हेटेड कॉरिडॉर तातडीने मंजूर करावा, अशी आग्रही मागणी 23 मार्च 2026 रोजी हिवाळी अधिवेशनात केली होती. तसेच राज्य आणि केंद्र सरकारकडे या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या कामावर शिक्कामोर्तब झाले असून लवकरच कामाला सुरुवात होईल. यातून वाहतूक सक्षमीकरणाच्या दृष्टीने पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या रस्त्यामुळे वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे तसेच बालेवाडी, बाणेर, सुस आणि बावधन परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे ये-जा करणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक गतिमान होऊन दैनंदिन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय माण, मारुंजी, नेरे, जांबे आणि कासारसाई परिसरातील नागरिकांनाही या प्रकल्पाचा थेट लाभ मिळेल. मुंबई–बंगळूर महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला आहे.

