वाकड परिसरात घरफोडी करणारे अट्टल चार गुन्हेगार जेरबंद!

10 लाख 34 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : वाकड परिसरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांचा पर्दाफास केला असून चार जणांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघड झाले असून 10 लाख 34 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या पथकाने केली आहे.

पोलिसांनी दिलेले माहितीनुसार एक जुलै 2026 रोजी उत्कर्ष चौक वाकड येथील बंद फ्लॅटच्या दरवाज्याचे लॉक कशानेतरी तोडून घरात प्रवेश करून घरातील सात लाख वीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले. याबाबत वाकड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. वाकड पोलीस ठाणे तपास पथकाने अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकरिता चोरी झालेल्या ठिकाणाचे आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. अज्ञात आरोपीने गुन्हा करण्यासाठी येताना व जातानाचा मार्ग निश्चित करून त्याचे फुटेज डेव्हलप करून पोलीस हवालदार वंदू गिरे यांनी बातमीदारामार्फत आरोपींचे नाव निष्पन्न केले.
त्यानंतर तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे व तपास पथकातील अंमलदार यांनी आरोपी बाबत सखोल तांत्रिक विश्लेषण करून बातमीदारांची सांगड घालून 15 जुलै रोजी इराणी कॅफे वाकड जवळून घरफोडी करणारा अट्टल आरोपी अतुल उर्फ आट्या चंद्रकांत आमले (वय 30, रा. गोसावी वस्ती, कर्वे रोड वारजे) यास अटक केली. आरोपीकडे कसून तपास केला असता आरोपीचे अन्य तीन साथीदार मोहन उर्फ आबा जनार्दन मुजमुले (वय 38, रा. सम्राट चौक, वाकड), भीमराव बाबुराव गंगावणे (वय 38, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, दत्त मंदिर रोड, वाकड), रामेश्वर लिंबाजी उपल्ले (वय 24, रा. रायवाडी, पोस्ट महाळुंगी, ता. चाकूर, जि. लातूर) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आले .सदर आरोपींकडे केलेल्या तपासात आरोपींकडून वाकड पोलीस स्टेशन हद्दीमधील घरफोडीचे एकूण पाच गुन्हे उघड करून त्यांच्याकडून 97.85 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण दहा लाख 34 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील मुख्य आरोपी अतुल उर्फ अट्या चंद्रकांत आमले (मुळगाव- आमलेवाडी, घोटावडे, ता. मुळशी) हा घरफोडी करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर व लातूर येथे एकूण 44 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस उपयुक्त प्रदीप जाधव परिमंडळ 2 यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, सहाय्यक पोलीस फौजदार संदीप गवारी, पोलीस हवालदार वंदू गिरे, दीपक साबळे, विजय घाडगे, हनुमंत कांबळे, विजय भुसारे, सचिन गायकवाड, पोलिस अंमलदार ज्ञानदेव झेंडे ,कौतेय खराडे, विक्रम भगत, समाधान कांबळे, अभिषेक मांडे, प्रमोद गायके व मंगेश लोखंडे यांनी केली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे हे करीत आहेत.

