प्राधिकरणातील उद्यानात हाणामारी ;परस्पर विरोधी गुन्हे दाखल!

पिंपरी : कौटुंबिक वादातून भाऊ-बहीण आणि तिच्या परिचितांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना शुक्रवार 17 जुलै रोजी प्राधिकरण सेक्टर क्रमांक 26 येथील उद्यानात घडली.

रेश्मा विशाल धोगरे (वय 32, रा. पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिचा भाऊ रितेश वासुदेव जाधव (वय 28, रा. रुपीनगर, तळवडे) आणि पती विशाल गंगाधर घोगरे (वय 35, रा. रुपीनगर, तळवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेश्मा या मैत्रीण संगीता यादव हिच्यासोबत उद्यानात फोटो काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तिचा भाऊ रितेश तेथे आला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रितेश याने मोठा दगड डोक्यात मारून रेश्मा यांना जखमी केले. पती विशाल याने त्यांचे हात धरून बोटे वाकडी केली आणि कानाखाली मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात रितेश वासुदेव जाधव यांनीही फिर्याद दिली आहे. त्यानुसार बहीण रेश्मा विशाल घोगरे आणि तिचा मित्र रोहित जाधव (वय 33 )यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश यांच्या फिर्यादीनुसार मित्राने बहिण एका अनोळखी पुरुषासोबत उद्यानात असल्याची माहिती दिल्यानंतर ते तेथे गेले. याबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून रेश्मा हिने त्यांना मारहाण केली. त्यानंतर तिचा मित्र रोहित याने शिवीगाळ करत पेव्हर ब्लॉक डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

