वाहतुकीला अडथळा निर्माण करून रिल्स बनवणाऱ्या तिघांना अटक!

पिंपरी : रस्त्यावर आलिशान गाड्या उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत रिल्स बनवणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करावी असे आदेश आयुक्त विनयकुमार चोबे यांनी दिल्यानंतर परिमंडल चारच्या पोलीस उपयुक्त यांनी कारवाई करून तीन जणांना अटक केली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवार 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडला आहे .

राम हिरामण राऊत (रा. भांबोली, ता. खेड), साहिल बारकू जांभळे (रा. वासुली, ता. खेड), आदित्य कैलास निखाडे (रा. भांबोली, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. प्रणव मालक पाचपुते (रा. वासुली, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत तुकाराम चौक ते मिंडेवाडी रस्त्यावर तीन सप्टेंबर रोजी अटक केलेल्या तिघांनी वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रिल्स तयार करण्यासाठी नागरिकांना त्रास दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाळुंगे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यावर चार वाहने रस्त्याच्या मधोमध उभी करून तसेच गाड्यांचा वेग कमी- जास्त करत या प्रकारचे कॅमेरा आणि ड्रोनच्या साह्याने चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी उपायुक्त श्वेता खेडकर यांना फोन करून संबंधिताचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करून अशा प्रकारे रिल्स करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर उपायुक्त खेडकर यांनी स्थानिक पोलिसांना संबंधित आरोपी आणि वाहनांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच बातमीदारांच्या मदतीने संबंधिताची आणि वाहनांची ओळख पटवली. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी फॉर्च्यूनर (एम एच 14/ 0005), स्कार्पिओ एम एच 14/ एसी/ 16 58 स्विफ्ट), एम एच 14/ एच डब्ल्यू/ 4708) आणि फ्रॉक्स एम एच 14/ एल एल/ 25 20) ही चार वाहने ताब्यात घेतली आहेत.

