Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

8th July 2026
पिंपरी-चिंचवड

आषाढीवारी पालखी सोहळा मार्ग तसेच विसावा ठिकाणांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी!

आषाढीवारी पालखी सोहळा मार्ग तसेच विसावा ठिकाणांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी!

सर्व विभागांनी समन्वयाने नियोजनात्मक काम करण्याच्या दिल्या सूचना
पिंपरी : आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. तसेच पालखी मुक्काम, विसावा तसेच या मार्गांवर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक सोयीसुविधांचे प्रभावी नियोजन करून सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवून कामकाज करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

viara vcc
viara vcc

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उत्साहात स्वागत करण्याची तयारी महानगरपालिकेच्या करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे स्वागत निगडी येथील भक्ती शक्ती चौकात केले जाते. यानंतर हा सोहळा आकुर्डी येथे मुक्कामी दोन्ही ठिकाणांची तसेच पालखी मार्गाची पाहणी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत दिघी येथील मॅगझिन चौकात केले जाते. या पालखी सोहळ्याच्या विसाव्याच्या ठिकाणासह महापालिका क्षेत्रातील कार्यक्षेत्रातील संपुर्ण पालखी मार्गाची पाहणी देखील आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.

निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे महापालिकेच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाच्या स्थळाची आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी पाहणी करून माहिती घेतली. यावेळी मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, मनोज सेठिया, उप आयुक्त प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंता अजय सुर्यवंशी, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, सहाय्यक आरोग्याधिकारी सीताराम गायकवाड तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश नांदुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निता गायकवाड यांच्यासह महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

यानंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आकुर्डी येथील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणाची पाहणी केली. तसेच दिंड्याच्या मुक्कामाचे ठिकाण असलेल्या महापालिकेच्या मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू माध्यमिक विद्यालय येथील पालखी विसावा ठिकाणाची पाहणी केली. यावेळी क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, कार्यकारी अभियंता वैशाली ननवरे आदी उपस्थित होते.

आकुर्डी येथील मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू माध्यमिक विद्यालय येथे दिंड्यांचा मुक्काम असतो. याठिकाणी शाळांमध्ये करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नाशिक फाटा रोड, दापोडी येथील पालखी विसावा आदी ठिकाणीही त्यांनी पाहणी केली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मोशी येथील मॅगझीन चौक येथे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात येते. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाबाबतची देखील माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी करून माहिती घेतली. यावेळी सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे, कार्यकारी अभियंता शिवराज वाडकर आदी उपस्थित होते. तसेच थोरल्या पादूका मंदिर या विसावा ठिकाणासही भेट देऊन तेथे देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवा सुविधांचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात यावे. कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता घेऊन सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून काम करावे, अशा सूचना आयुक्तांनी पाहणी दौऱ्यावेळी दिल्या.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"