ज्या भाषेत ज्ञानेश्वरी , जेथे छत्रपती शिवाजी महाराज राजे होऊन गेले, ती भाषाच मुळात अभिजात: पंडित हृदयनाथ मंगेशकर

अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान
पिंपरी : ज्या मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ लिहीले गेले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला अभिजाततेचा वेगळा दर्जा देण्याची गरजच नाही, ती भाषा मुळातच अभिजात आहे. या अभिजात मराठीतील अभिजात काव्याला स्वरबद्ध करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. मला जेव्हा असे काव्य सापडत गेले, तेव्हा त्याला चाली देत गेलो. माझ्या बालपणापासूनच आईकडून ऐकलेल्या गोष्टी आणि नंतर तिने वाचून दाखवलेल्या पुस्तकांमधून भाषेचे सौंदर्य माझ्या मनावर संस्कार करत गेले. माझी मोठी बहीण स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हिच्या आशीर्वादाचा माझ्या संगीतसाधनेत मोठा वाटा आहे. माझी मोठी बहीण शारदा विश्वमोहिनी होती. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या निमित्ताने केलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. या सन्मानाबद्दल मी महानगरपालिकेचा मनःपूर्वक आभारी आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित अभिजात मराठी सन्मान दिन तसेच अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

याप्रसंगी हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारती मंगेशकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रविंद्र, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली, ज्या मराठीध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्याची गरजच नाही. ती भाषा मुळातच अभिजात आहे. या अभिजात मराठी भाषेतील अभिजात काव्याला स्वरबद्ध करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. मला जेव्हा अभिजात काव्य सापडत गेले, तेव्हा त्या काव्याला चाली देत गेलो. कविता मला अंतर्मुख करते. माझ्या बालपणी आई मला गावाकडच्या अनेक गोष्टी सांगायची. त्यानंतर आईने मला पुस्तके वाचून दाखवण्याचे ठरवले. माझ्या हातात आलेले पहिले पुस्तक हे एक नाटक होते आणि त्या नाटकाचे लेखक होते स्वातंत्र्यवीर सावरकर. त्या काळात कानावर पडणाऱ्या भाषेच्या सौंदर्याने मनावर खोल संस्कार झाले. शब्द, भाषा आणि स्वर यांचे नाते तेव्हापासूनच मनात रुजत गेले.
स्वरांची माऊली आहे, शब्दांची माऊली आहे आणि भाषेचीही एक माऊली आहे. ज्ञानेश्वरांना लोक ‘माऊली’ म्हणू लागले, कारण ते ज्या भाषेला टेकून बसले होते, त्या भाषेनेच असंख्य लोकांना ज्ञान आणि भावविश्व दिले. त्या भाषेचे वैभव अनुभवताना तिच्याप्रती असलेली कृतज्ञता अधिक दृढ होते. माझी मोठी बहीण लता मंगेशकर यांनी अभिजात संगीत निर्माण केले. त्यांच्या आशीर्वादाने आणि संस्कारांनी माझ्या संगीतसाधनेतून जे काही निर्माण झाले, त्यामागे त्यांचे मोठे योगदान आहे. माझी मोठी बहीण शारदा विश्वमोहिनी होती.आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या निमित्ताने माझा जो सन्मान केला, त्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मनःपूर्वक आभारी आहे. हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा आहे.
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले, पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि महान कलाकाराचा सन्मान करण्याचे भाग्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला लाभले, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. मुळात आपल्या उपस्थितीमुळेच या सोहळ्याची उंची खूप मोठी झाली आहे. आपल्या कर्तृत्वाची आणि संगीतसाधनेची व्याप्ती शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला, तरी आमच्या शब्दांना एक किनारा आहे पण आपल्या शब्दांना आणि आपल्या संगीताला कोणताही किनारा नाही. आपण स्वतः एक अथांग समुद्र आहात.
प्रास्ताविकात बोलताना विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या अभिजातत्वाचा गौरव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या व्यवहारात आणि आपल्या पुढील पिढ्यांच्या संस्कारांमध्ये दिसला पाहिजे.
या विशेष दिवसाच्या निमित्ताने आज आपण ज्यांचा सन्मान करीत आहोत ते मराठी संगीतविश्वातील एक विलक्षण प्रतिभावान व्यक्तिमत्त्व आहे. संगीतसूर्य मास्टर दीनानाथजी मंगेशकर यांच्या संगीतपरंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या मंगेशकर कुटुंबाने भारतीय संगीतविश्वाला अनेक अनमोल स्वर दिले. त्या महान परंपरेतून आलेल्या पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांनी मात्र आपल्या स्वतंत्र प्रतिभेने, प्रयोगशील संगीतदृष्टीने आणि सखोल संगीतसाधनेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची बैठक आहे, लोकसंगीताची मातीशी जोडलेली सहजता आहे, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मराठी शब्दांविषयीची विलक्षण संवेदनशीलता आहे. आज अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचेही विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड म्हणाले.
यावेळी उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी मानले. तसेच मानपत्राचे वाचन विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले.

