भोसरी- वाकड इलेक्ट्रिक मेट्रो डीपीआरसाठी 85 लाखाच्या खर्चास स्थायीची मान्यता!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील पुणे – नाशिक महामार्ग ते मुंबई- बंगळूर महामार्गास जोडणारी (इलेक्ट्रिक रॅपिड ट्राॅन्झिट सिस्टीम) इलेक्ट्रिक मेट्रो बस सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल डीपीआर महामेट्रो तयार करणार असून डीपीआर तयार करण्यासाठी 85 लाख 41 हजार 985 रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी दिली.

शहरातील नागरिकांना शहरांतर्गत प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना राज्य शासनाने महापालिकेला केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली होती. शहरातील नवीन मेट्रो मार्ग तयार करण्याबाबत चर्चा झाली. बीआरटीएस मार्गास प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याने त्या मार्गावर इलेक्ट्रिक मेट्रो सुरु करण्याचा प्रस्ताव महामेट्रोने दिला होता. त्यानुसार भोसरीतील गोडाऊन चौक, नाशिक महामार्ग, कुदळवाडी चौक, ऑटो क्लस्टर, काळेवाडी फाटा चौक, जगताप डेअरी चौक ते वाकड चौक या बीआरटीएस मार्गावर मेट्रो मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा डीपीआर महामेट्रो तयार करणार असून डीपीआर तयार करण्यासाठी महामेट्रोने 85 लाख 41 हजार 985 रुपये खर्च करण्याचे कळवले होते. त्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
चालू आठवड्यातच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीत महापलिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत सादरीकरण देखील केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीने याचे नियोजन करावे अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे स्थायी समितीला हा प्रस्ताव मान्य करणे गरजेचे होते. मागील सात जुलै पासून स्थायी समितीच्या पुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पडून होता. अखेर तो मंजूर करण्यात आला आहे.

