Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

मालमत्ता कर वसुली; थकबाकीदारांवर नियोजनबद्ध कारवाई : अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

मालमत्ता कर वसुली; थकबाकीदारांवर नियोजनबद्ध कारवाई : अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

१३०० कोटींचे मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट
पिंपरी : आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १३०० कोटींचे मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांवर नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले. विशेषतः बिगरनिवासी व औद्योगिक मालमत्तांच्या थकबाकी वसुलीला प्राधान्य देत स्वतंत्र वसुली पथके तयार करून कारवाईची प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या मालमत्ता कर वसुलीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सांडभोर बोलत होत्या. बैठकीला उपायुक्त सचिन पवार यांच्यासह कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रशासन अधिकारी, मुख्य कार्यालयातील अधिकारी, सर्व १८ क्षेत्रीय कार्यालयांतील मंडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त सांडभोर म्हणाल्या, ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची बिले बजावण्यात आली आहेत, मात्र अद्याप कराचा भरणा करण्यात आलेला नाही, अशा मालमत्तांची स्वतंत्रपणे नोंद घेण्यात यावी. संबंधित मालमत्ताधारकांशी संपर्क साधून कर भरण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे. तसेच थकबाकी वसुलीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेदेखील त्यांनी सांगितले. ३० सप्टेंबरपर्यंत कर वसुलीच्या मोहिमेला विशेष गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तसेच बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र, मोकळ्या जागा तसेच इतर मालमत्ताधारकांची यादी तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच, ज्या मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कराची थकबाकी आहे, त्यांना ३० सप्टेंबरपूर्वी नोटिसा बजावून, १ ऑक्टोबरपासून जप्तीची कारवाई सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर वसुलीचे सूक्ष्म नियोजन करावे. कोणत्या प्रकारच्या मालमत्तांकडून किती थकबाकी आहे, कोणत्या मालमत्ताधारकांना बिले बजावण्यात आली आहेत आणि अद्याप भरणा झालेला नाही, याची माहिती अद्ययावत ठेवून त्यानुसार वसुलीची कार्यवाही करावी, असेही अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांनी स्पष्ट केले.

५८४ कोटी ४९ लाख रुपयांचा भरणा
महापालिकेने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कर वसुलीचे १३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. १ एप्रिल २०२६ ते १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १२ वाजेपर्यंत ५८४ कोटी ४९ लाख ४५ हजार २२८ रुपयांचा मालमत्ता कर भरणा झाला आहे. महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर वेळेत भरणाऱ्या नागरिकांसाठी सवलत योजना लागू करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मालमत्ता कर ऑनलाइन भरल्यास सामान्य करावर ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे २० दिवस शिल्लक आहेत.

ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, त्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ऑनलाइन पद्धतीने कराचा भरणा करावा आणि ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आहे. अधिकाधिक नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरून सवलत योजनेचा लाभ घ्यावा, तसेच महापालिकेच्या कर वसुली प्रक्रियेस सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"