सायबर फसवणुकीतील करोडो रुपये स्वीकारणाऱ्या गोवा व कोलकत्ता येथील आरोपींना अटक!

सायबर पोलीस ठाण्याची कारवाई
पिंपरी : विदेशी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट व आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यास पाचशे टक्के नफा मिळेल असे आमीष दाखवून 83 लाख 80 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीसांनी गोवा आणि कोलकत्ता येथून दोन आरोपींना अटक केली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली.

अभिषेक मोहन आचरेकर (वय 34, रा. गोवा), अनमोल शर्मा (वय 32, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस आयुक्त यांच्या गुन्हे तपासाबाबतच्या सूचनानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे व सहाय्यक पोलीस आयुक्त सायबर व आर्थिक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड हे गुन्ह्याचा तपास करीत होते. तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी व पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे यांच्या स्वतंत्र तपास पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.
तपासादरम्यान आरोपींनी फिर्यादी यांची फसवणूक करून विविध बँक खात्यांमध्ये रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या आर्थिक व तांत्रिक तपासामध्ये 21 मार्च 2026 रोजी आरोपी यांच्याकडून एकूण 30 लाख रुपये सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील एका बँक खात्यामध्ये जमा झाल्याचे आढळून आले. संबंधित बँक खाते बाबत बँकेकडून माहिती प्राप्त केली असता सदर खाते शिवशक्ती इंटरप्राईजेस या नावाने असून ते भागीदारीमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. अभिषेक मोहन आचरेकर (रा. गोवा) व प्रतीक्षा नाईक (रा. गोवा)यांच्या नावे खाते होते. त्यानंतर खातेधारक अभिषेक मोहन आचरेकर याचा तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून शोध घेण्यात आला मात्र तो सातत्याने राहण्याचे ठिकाण बदलत असल्याचे तपासात निदर्शनास आले.
28 ऑगस्ट रोजी आरोपी अभिषेक आचरेकर हा पुणे येथे आल्याची तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व त्यांच्या पथकाने खेड शिवापुर येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे बँक खाते उघडून त्यामध्ये त्याचा साथीदार अनमोल शर्मा रा कोलकत्ता पश्चिम बंगाल यांच्या मदतीने सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारल्याची कबुली दिली. अभिषेक आचरेकर यास अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आली. पोलीस तपासादरम्यान त्याने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.
आरोपी आचरेकर हा त्यांच्या साथीदारांच्या माध्यमातून गोवा येथील सामान्य नागरिकांना विशेषता: महिलांना कर्ज देण्याचे अमिष दाखवत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून अंदाजे 60 ते 70 बँक खाते प्राप्त केली. ती बँक खाती पुढे त्याचा साथीदार अनमोल शर्मा व इतर साथीदारांच्या माध्यमातून सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी वापरली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्राथमिक तपासात अशा बँक खात्यांमधून सायबर फसवणुकीतील करोडो रुपये स्वीकारले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. पुढील आर्थिक व तांत्रिक तपास सुरू आहे.
अनमोल शर्मा यास कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे अटक
दुसरा आरोपी अनमोल शर्मा याचा तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. तो कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस उप निरीक्षक प्रकाश कातकाडे व त्याच्या पथकास कोलकत्ता येथे रवाना करण्यात आले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आला. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने आरोपी आचरेकर याच्याकडून विविध बँक खाते प्राप्त करून त्याचा व इतर साथीदारांचा वापर करून सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारल्याची कबुली दिली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस, पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, पोलिस अंमलदार दीपक भोसले, विनायक मस्कर, हेमंत खरात, सुभाष पाटील, समीर घाडगे, मोहन वरळे, सोपान बोधवाड ,अतुल लोखंडे, सुरज शिंदे व महिला पोलिस अंमलदार भाविका प्रधान, नम्रता कांबळे सर्व सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली.

