फक्त मुद्द्याचं!

30th April 2026
पुणे

मेट्रो-३ ;’पीएमआरडीए’ ‘ॲक्शन मोड’मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी!

मेट्रो-३ ;’पीएमआरडीए’ ‘ॲक्शन मोड’मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी!

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार
पुणे : पुणेकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या आणि आयटी हबला शहराशी जोडणाऱ्या माण-हिंजवडी-शिवाजीनगर या ‘मेट्रो मार्ग-३’ प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. या प्रकल्पातील तांत्रिक अडथळे दूर करून काम वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने ‘पीएमआरडीए’च्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी विविध ठिकाणांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा घेतला.

viara vcc
viara vcc

कामाची गुणवत्ता आणि प्रगतीवर विशेष भर
‘पीएमआरडीए’द्वारे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाच्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ (PITCMRL) सोबत हा प्रकल्प राबविला जात आहे. मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात कामाची गुणवत्ता आणि प्रगतीवर विशेष भर देण्यात आला. पाहणीदरम्यान विद्यापीठ चौकातील पाषाण रॅम्पजवळ महापालिकेच्या जलवाहिनीतून मोठी पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. या गळतीमुळे मेट्रोच्या कामात अडथळा येत असल्याने अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही गळती तातडीने थांबविण्याच्या सूचना दिल्या.

तसेच, ‘पीएआर २१’ येथील पाहणीदरम्यान मेट्रोच्या जिन्यासाठी आवश्यक असलेली जागा मोकळी करण्याचे आदेशही देण्यात आले. यामुळे या भागातील जिन्याचे प्रलंबित काम मार्गी लागणार आहे. बाणेर येथील ‘पीएआर १५’ ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो जिन्याच्या कामाचीही यावेळी पाहणी करण्यात आली. केवळ वेगच नव्हे, तर कामाची गुणवत्ताही आंतरराष्ट्रीय दर्जाची असावी, असे निर्देश के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता उमेश मल्लावत, कनिष्ठ अभियंता सुमीत यादव, गजानन पाटील यांच्यासह पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि अभियंते उपस्थित होते.

“प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तांत्रिक अडथळे दूर करण्याला आमचे प्राधान्य आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर दिलासा मिळावा, यासाठी ‘पीएमआरडीए’ प्रशासन प्रयत्नशील आहे.” — के. मंजुलक्ष्मी,* अतिरिक्त महानगर आयुक्त, पीएमआरडीए.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"