Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
पिंपरी-चिंचवड

गणेशविसर्जन सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज….!

गणेशविसर्जन सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज….!

विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशमन जवानांसह आपदा मित्र, सर्पमित्र, प्राणीमित्र व जीवरक्षकांची तैनाती
पिंपरी : गणेशोत्सवातील गणेशमूर्ती विसर्जनाच्या उद्या अनंत चतुर्दशी या दिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने आयुक्त डॅा..विजय सुर्यवंशी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,तृप्ती सांडभोर आणि विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जनासाठीची तयारी पूर्ण केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, प्रशिक्षित अग्निशमन जवान, आपदा मित्र आणि जीवरक्षकांची तैनाती करण्यात आली आहे. तसेच कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्रे, निर्माल्य संकलन आणि अन्य आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके व रुग्णवाहिका
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत तसेच आवश्यकता भासल्यास रुग्णालयात हलविता यावे, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित स्टाफ नर्स, वॉर्डबॉय आणि रुग्णवाहिका चालकांचा समावेश आहे.

indra dairy
indra dairy

अग्निशमन विभागाचा बंदोबस्त
गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका अग्निशमन विभागाकडून प्रशिक्षित अग्निशमन जवान विसर्जनस्थळी तैनात करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष अग्निशमन वाहनेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. याशिवाय आपदा मित्र, सर्पमित्र, प्राणीमित्र आणि जीवरक्षकांची तैनाती करण्यात आली आहे. विसर्जनाच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही पथके आवश्यकतेनुसार मदत करणार आहेत.

अ, ड आणि फ क्षेत्रीय कार्यालयांत कृत्रिम तलाव
महापालिकेच्या उपलब्ध नोंदीनुसार ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १०, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ११ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात २० कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नोंदीनुसार, स्पाईन रोड, यमुनानगर; मोहननगर सांस्कृतिक भवन; गणेश तलावाजवळ, सेक्टर २६ प्राधिकरण; तसेच नियोजित महापौर निवास मैदान, सेक्टर २७ प्राधिकरण येथे कृत्रिम हौद असलेली विसर्जन केंद्रे तयार करण्यात आली आहेत. याशिवाय ठाकरे मैदान, यमुनानगर; स्पाईन रोड, यमुनानगर; विठ्ठल मंदिर, आकुर्डी; सेंट उर्सुला शाळेजवळ, आकुर्डी; दुर्गे चौक, काळभोरनगर; मोहननगर सांस्कृतिक भवन; कै. पांडुरंग उर्फ काकाभाऊ सभागृह, आकुर्डी गावठाण येथे संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘
आतापर्यंत ४९ हजार ८०३ मूर्तींचे संकलन,विसर्जन
महापालिकेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार १४ ते २३ सप्टेंबरदरम्यान एकूण ४९ हजार ८०३ गणेशमूर्तींचे संकलन/विसर्जन झाले आहे. यामध्ये १० हजार १७० पर्यावरणपूरक मूर्ती आणि ३९ हजार ६३३ पीओपी मूर्तींचा समावेश आहे.

२२ हजार ६४७ किलो निर्माल्य संकलित
विसर्जनाच्या काळात निर्माल्य नदी, तलाव किंवा अन्य जलस्रोतांमध्ये जाऊ नये यासाठी निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उपलब्ध नोंदीनुसार २३ सप्टेंबरपर्यंत एकूण २२ हजार ६४७.२५ किलो निर्माल्य संकलित झाले आहे. नागरिकांनी फुले, हार, दुर्वा तसेच अन्य पूजासाहित्य जलस्रोतांमध्ये न टाकता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य संकलन व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य
नागरिकांनी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांचा वापर करावा. पर्यावरणाचे संरक्षण आणि जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती व निर्माल्याचे विसर्जन योग्य पद्धतीने करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
अंतिम विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडणार असल्याने नागरिकांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे, विसर्जनासाठी सुरक्षित ठिकाणांचा वापर करावा आणि वैद्यकीय, अग्निशमन, जीवरक्षक व अन्य आपत्कालीन पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"