Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

28th October 2026
पुणे

‘इनर रिंग रोड’ भूसंपादनासाठी; मावळ, मुळशी ,हवेलीत प्रक्रियेला वेग!

‘इनर रिंग रोड’ भूसंपादनासाठी; मावळ, मुळशी ,हवेलीत  प्रक्रियेला वेग!

संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक रकमेचा लाभ देण्याची ‘पीएमआरडीए’ची ग्वाही
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून आखण्यात आलेल्या ६५ मीटर रुंदीच्या ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) बाधित शेतकरी व खातेदारांशी थेट संवाद साधण्यासाठी हवेली, मावळ आणि मुळशी तालुक्यांत विशेष ग्रामबैठका, तर मुळशी व हवेली तालुक्यांत संयुक्त मोजणीचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक रकमेचा लाभ देण्याची ग्वाही ‘पीएमआरडीए’ने दिली आहे. तसेच, १४४ कोटींचा मोबदला ‘पीएमआरडीए’कडून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी यापूर्वी खेड तालुक्यातील सोळू तसेच हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे व निरगुडी येथील जमिनींची मोजणी पूर्ण झाली असून, ‘पीएमआरडीए’तर्फे १४४ कोटींचा निधी मोबदल्यापोटी वर्ग करण्यात आला आहे. आता उर्वरित आवश्यक जमिनींच्या संपादनासाठी मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील गावांसाठी ऑक्टोबर महिन्याचे विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

indra dairy
indra dairy

स्थानिक शेतकरी व खातेदारांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी मावळ आणि हवेली तालुक्यांत ग्रामबैठका पार पडत आहेत. यामध्ये साळुंब्रे व दारुंब्रे (ता. मावळ) तसेच मांजरी खुर्द व वडकी (ता. हवेली) येथे बैठका पार पडल्या. गोंडुबरे व परंदवडी (ता. मावळ), तर सांगवडे व धामणे (ता. मावळ) येथे ग्रामबैठका आयोजित करण्यात आल्या होत्या.

मुळशी तालुक्यातील बाधित गावांमधील खातेदारांशी थेट चर्चा करण्यासाठी मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकां पार पडल्या . यामध्ये बाधन बुद्रुक येथे पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीत पहिली बैठक , त्यानंतर सुस येथे श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर सभागृहात, नांदे येथे भैरवनाथ मंदिर सभागृहात, माण आणि हिंजवडी येथे ग्रामपंचायत सभागृहात बैठका पार पडल्या. पुढे मारुंजी येथे ग्रामपंचायत कार्यालयात, नेरे येथे भैरवनाथ मंदिरासमोर आणि जांबे येथे ग्रामपंचायत कार्यालयात खातेदारांशी थेट संवाद साधला .. या बैठकींना पुणे महानगरपालिका आणि ‘पीएमआरडीए’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बाधित जमिनींचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी मुळशी व हवेली तालुक्यांत संयुक्त मोजणी मोहीम राबवली जाणार आहे. मुळशी ,नेरे येथून मोजणीला सुरुवात होणार असून, १२ ऑक्टोबरला हिंजवडी, १३ ऑक्टोबरला जांबे, १४ ऑक्टोबरला माण, १५ ऑक्टोबरला मारुंजी आणि १७ ऑक्टोबर रोजी नांदे येथे मोजणी पार पडेल. तसेच, ३०० हून अधिक बाधित खातेदार असलेल्या हवेली तालुक्यात १३ ऑक्टोबर रोजी मांजरी खुर्द (१५५ खातेदार), १५ ऑक्टोबरला कोलवडी (२० खातेदार) आणि १६ ऑक्टोबर रोजी वडकी (१२५ खातेदार) येथील जमिनींची संयुक्त मोजणी केली जाणार आहे. मोजणीनंतरच मूल्यांकनाची रक्कम निश्चित करणे शक्य होणार आहे.

या सर्व संबंधित बाधित खातेदारांनी स्वतः उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन ‘पीएमआरडीए’च्या जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता तसेच उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"