इमारत खरेदी खत रद्द करून 14 लाखाची फसवणूक!

पिंपरी : इमारत खरेदी खत झाले असताना देखील व्यवहार रद्द करून एका व्यक्तीने 14 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ही घटना अठरा जुलै ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हनुमान नगर, धावडे वस्ती, भोसरी येथे घडली.
या प्रकरणी प्रदीप गोपाल गुप्ता (वय 37, शिवगणेश नगर मंदिर मागे, हनुमान नगर, भगत वस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. नरेश रामचंद्रराव बालकोंडेकर (वय 42, रा. सर्वे नंबर 23 ,शिवगणेश नगर मंदिर मागे हनुमान नगर, भगत वस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांच्या मालकीची सर्वे नंबर 23 मधील सिटी सर्वे क्रमांक 4162 मधील अंदाजे 468 चौरस फूट जागा त्यावरील बांधकाम पहिला, दुसरा व तिसरा मजला भगत वस्ती, भोसरी येथील घराच्या व्यवहारात 18 जुलै 2025 रोजी आरोपी यांच्या मोबाईल क्रमांकावर गुगल पे द्वारे 51 हजार रुपये ,28 जुलै 2025 रोजी आरोपीच्या युनियन बँक खाते क्रमांक 19 लाख 49 हजार रुपये आरटीजीएस द्वारे फिर्यादीने पाठवले. 20 ऑगस्ट 2025 रोजी पाच लाख रुपये आरोपी यांच्या युनियन बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक वर चेक द्वारे पाठवले .सदर व्यवहाराचे एकूण 25 लाख रुपये फिर्यादीने आरोपीला दिले आहेत. 28 जुलै 2025 रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली 14 येथे दस्त नोंदणी करून खरेदी खत करण्यात आले. खरेदी खतापोटी फिर्यादीने दोन लाख 16 हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. सदर व्यवहारात फिर्यादी कडून आरोपीला अजून दहा लाख रुपये देणे असताना आरोपीने सदर व्यवहार रद्द केला. त्यानंतर फिर्यादीने त्यांना दिलेले 25 लाख रुपये परत देण्यासाठी वारंवार मागणी केली असता फिर्यादीस अकरा लाख रुपये आरोपीने परत केले. मात्र उर्वरित 14 लाख रुपये वारंवार मागणी करूनही परत दिले नाहीत. याउलट आरोपी व त्यांची पत्नी यांनी फिर्यादीला तुला बघून घेऊ अशी धमकी दिली. भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टापरे हे तपास करत आहेत.

