Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

18th September 2026
पिंपरी-चिंचवड

बदनामीला न घाबरता सायबर फसवणुकीविरोधात तक्रार नोंदवा : सायबरतज्ज्ञ एपीआय वैभव पाटील

बदनामीला न घाबरता सायबर फसवणुकीविरोधात तक्रार नोंदवा : सायबरतज्ज्ञ एपीआय वैभव पाटील

‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ‘पीएमआरडीए’मध्ये ‘सायबर सुरक्षा जागरूकता’ सत्राचे आयोजन
पिंपरी : “आजच्या काळात सायबर गुन्ह्यांचे सर्वाधिक बळी हे सुशिक्षित नागरिकच ठरत आहेत. कोणत्याही फसव्या आमिषाला किंवा तांत्रिक गैरप्रकाराला बळी पडल्यानंतर सायबर गुन्हे घडतात. मुख्यतः समाजात बदनामी होईल, या भीतीने नागरिक घाबरतात आणि त्यामुळेच त्यांची मोठी आर्थिक फसवणूक होते. मात्र, आजच्या ‘एआय’च्या आधुनिक युगात बदनामीला घाबरण्याची अजिबात गरज नाही. सायबर गुन्हेगारांचे जाळे कितीही मोठे असले, तरी योग्य वेळी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होते. त्यामुळे फसवणूक झाल्यास शांत बसू नका आणि गुन्हेगारांना अजिबात घाबरू नका,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबरतज्ज्ञ तथा सायबर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी केले.

viara vcc
viara vcc

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्म’ या उक्तीनुसार सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जात आहे. तसेच, गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

indra dairy
indra dairy

गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता ‘पीएमआरडीए’च्या आकुर्डी येथील मुख्यालयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ‘सायबर सुरक्षा जागरूकता’ या विषयावर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबरतज्ज्ञ तथा सायबर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी ‘पीएमआरडीए’तील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पाटील म्हणाले, “इन्व्हेस्टमेंट फ्रॉड, कस्टम किंवा फेडएक्स पार्सलच्या नावाने येणारे धमकीचे कॉल, वीज बिल भरणे, गिफ्ट व्हाउचर आणि रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. व्हॉट्सॲपवर वरिष्ठ अधिकारी किंवा बॉस असल्याचे भासवून आपत्कालीन परिस्थितीत पैशांची मागणी करणाऱ्या संदेशांना बळी पडू नये. सध्या मॅट्रिमोनियल साइट्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाणही मोठे असून, अनोळखी व्यक्तींवर कोणताही आर्थिक विश्वास ठेवू नये. तसेच, बनावट आणि अनधिकृत कर्ज देणाऱ्या ॲप्सपासून नेहमी दूर राहावे. एनीडेस्क किंवा क्विक सपोर्ट यांसारखी ॲप्स डाउनलोड करायला लावून फसवणूक करणारे लोक फोनचा ॲक्सेस मिळवतात. अशा अनोळखी ॲप्सना कधीही फोनमध्ये प्रवेश देऊ नये. कमिशनच्या आमिषाला बळी पडून आपले बँक खाते सायबर गुन्हेगारांना वापरण्यासाठी देऊ नये. अन्यथा, नागरिकांवरही या प्रकरणात कायदेशीर कारवाई होऊ शकते.”

“सोशल मीडिया खाती सुरक्षित ठेवण्यासाठी ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ नक्की सुरू करावे. तसेच, बनावट प्रोफाइल्स आणि ओळख चोरीपासून सावध राहावे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा अज्ञात एपीके फाइल्स इन्स्टॉल करू नयेत,” असा सल्ला देऊन गहाळ झालेले मोबाईल ब्लॉक करण्यासाठी तसेच स्पॅम कॉल्सची तक्रार करण्यासाठी ‘संचार साथी’ या शासकीय पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रबोधन सत्रादरम्यान सादरीकरणाद्वारे सायबर गुन्हेगारांच्या विविध क्लृप्त्या आणि त्यापासून बचाव करण्याच्या पद्धतींवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. तसेच, कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक झाल्यास त्वरित ‘१९३०’ या राष्ट्रीय हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘पीएमआरडीए’चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे होते. या प्रसंगी उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे यांच्यासह सायबरतज्ज्ञ पोलिस कॉन्स्टेबल समीर घाडगे व शिवाजी बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार पी सांगळे यांनी मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"