बंद पाडलेले बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी खंडणीची मागणी!

तिघे अटकेत
पिंपरी : बंद पडलेले बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी पुन्हा पुन्हा खंडणी मागून दमदाटी, धमकी देऊन त्रास देणाऱ्या तीन व्यक्तींना देहूरोड पोलीसांनी अटक केली आहे. संजय सदाशिव शेंदुरकर, सिद्दिक इस्माईल शेख, लक्ष्मण मोहन पांचाळ (सर्व रा. साईनगर मामुर्डी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .

याप्रकरणी उस्मान हसन शेख (वय 44, रा. थेरगाव, सर्वे नंबर 12 / सहा ,भोरडे नगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या सर्वे नंबर 15 / एक/ एक / दोन व 17 / एक ब या एकूण साडेआठ गुंठे जागेवर डायमंड वन नावाचा इमारतीचा प्रोजेक्ट सुरू केला आहे. मात्र आरोपींनी जागामालक, स्थानिक गुंड यांच्या मदतीने हे काम वेळोवेळी बंद पाडले. हे काम पुन्हा चालू करून देण्याचा मोबदला म्हणून आरोपी क्रमांक दोन यांनी पन्नास हजार रुपये स्वीकारल्यानंतरही फिर्यादीचे काम बंद पाडण्याची दमदाटी, धमकी देऊन शिवीगाळ करत खंडणीची मागणी केली.
फिर्यादी कडून पाच फेब्रुवारी 2024 ते आज पर्यंत वेळोवेळी रोख व ऑनलाइन स्वरूपामध्ये सात लाख रुपये स्वीकारून पुन्हा पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी करून फिर्यादी कडून जबरदस्तीने अडीच लाख रुपयांचा धनादेश धमकावून सही करून काढून घेतला. आरोपी क्रमांक तीन याने आरोपी क्रमांक दोन यांच्या सांगण्यावरून फिर्यादीस ॲट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन स्वतःसाठी चार लाख 70 हजार रुपये व आरोपी क्रमांक दोन यांच्याकरिता पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. जुना वाद काढून फिर्यादीला अवैधरित्या अतिक्रमण करून फिर्यादीकडे खंडणीच्या स्वरूपात फ्लॅटचा ताबा देण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड व गोडगे हे तपास करत आहेत.

