स्वच्छ पिंपरी चिंचवडसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, महापौर रवि लांडगे!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेत देशात अव्वल स्थानावर नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ अंतर्गत नागरिकांचा अभिप्राय हा शहराच्या विकासाचा महत्त्वाचा आधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर रवि लांडगे म्हणाले की, शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी नागरिकांचे मत अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देत प्रत्येकाने आपला अभिप्राय नोंदवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. “मी माझा अभिप्राय दिला आहे, आपणही जरूर नोंदवा,” असे सांगत महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नागरिकांना https://cf.sbmurban.org या संकेतस्थळावर जाऊन सहजपणे आपला अभिप्राय नोंदवता येणार आहे.
पिंपरी चिंचवडला देशात स्वच्छतेत अग्रक्रमांक मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही महापौर रवि लांडगे यांनी नमूद केले आहे.
तर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही नागरिकांना सहभागाचे आवाहन करत म्हटले की, “स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ मध्ये नागरिकांचा अभिप्राय हा शहराच्या गुणवत्तेचा आणि प्रगतीचा आरसा आहे. तुमच्या मतांमुळे शहरातील सेवा अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख बनू शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपला अभिप्राय नोंदवून शहराच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे.

