फक्त मुद्द्याचं!

31st May 2026
पिंपरी-चिंचवड

जनगणना प्रक्रियेस नागरिकांचे सहकार्य आवश्यक : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी!

जनगणना प्रक्रियेस नागरिकांचे सहकार्य आवश्यक : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी!

शिक्षण, आरोग्य व नागरी सुविधांच्या नियोजनासाठी जनगणना माहिती महत्त्वाची
पिंपरी : जनगणना २०२७’ अंतर्गत सुरू असलेली ‘घरसूचीकरण व घरगणना’ प्रक्रिया वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी प्रगणकांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

viara vcc
viara vcc

महापालिका क्षेत्रात १६ मेपासून प्रगणकांमार्फत घरसूचीकरण आणि घरगणना प्रक्रिया सुरू असून, स्व-गणना माध्यमातून नागरिकांनी भरलेल्या माहितीची पडताळणी आणि अंतिम नोंदणी सध्या केली जात आहे. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला स्व-गणना ओळख क्रमांक (SE ID) प्रगणकांना उपलब्ध करून द्यावा, असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

स्व-गणना ओळखक्रमांक उपलब्ध झाल्यानंतरच संबंधित घराची जनगणना प्रक्रिया अंतिम स्वरूपात पूर्ण होऊ शकते. ज्या नागरिकांनी अद्याप स्व-गणना केलेली नाही, त्यांची माहिती प्रगणकांकडून प्रत्यक्ष भेटीद्वारे नोंदविण्यात येत असून ही प्रक्रिया १४ जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

जनगणना कायदा, १९४८ अंतर्गत राबविण्यात येणारी जनगणना ही राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची प्रक्रिया असून, विकास नियोजनासाठी अचूक आणि विश्वासार्ह माहिती संकलनाचा हा आधार मानला जातो. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांच्या प्रभावी नियोजनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

जनगणना ही शहराच्या विकास नियोजनाचा महत्त्वाचा आधार असून नागरिकांनी अधिकृत प्रगणकांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा तसेच, प्रगणकांकडून विचारण्यात येणारी माहिती वेळेत व अचूकपणे उपलब्ध करून देत नागरिकांनी ‘जनगणना २०२७’ प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी यावेळी केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"