फक्त मुद्द्याचं!

30th April 2026
पिंपरी-चिंचवड

थेरगाव येथे होणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलचा सभापती अभिषेक बारणे यांनी घेतला आढावा!

थेरगाव येथे होणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलचा सभापती अभिषेक बारणे यांनी घेतला आढावा!

अत्याधुनिक उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील रुग्णांना कर्करोगावर सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी थेरगाव येथे महानगरपालिकेच्या वतीने भव्य कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. या हॉस्पिटलच्या उभारणीचा आणि विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी आज, ३० एप्रिल रोजी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

viara vcc
viara vcc

या पाहणी दौऱ्यादरम्यान अभिषेक बारणे यांनी हॉस्पिटल परिसरातील पार्किंग सुविधा, सुरक्षा व्यवस्था, ऑक्सिजन आणि पाणी पुरवठा यंत्रणा, तसेच स्वच्छतेच्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. रुग्णालयात पुरवल्या जाणाऱ्या संभाव्य आरोग्य सेवांची माहिती घेत असताना त्यांनी कामाचा दर्जा आणि गती याबाबत प्रशासनाला आवश्यक सूचनाही केल्या.

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. मुसलगी, डॉ. सोनेकर, डॉ. कुलकर्णी यांसह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

हे रुग्णालय जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. यामध्ये लिनियर ॲक्सिलरेटर, ब्रॅकीथेरपी युनिट्स आणि पीईटी-सीटी स्कॅनर यांसारखी महागडी यंत्रसामग्री बसवण्यात येणार आहे. येथे प्रामुख्याने स्तनाचा, फुफ्फुसाचा, कोलोरेक्टल, प्रोस्टेट आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर विशेष उपचार केले जातील. तसेच केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया, समुपदेशन आणि पुनर्वसन या सेवा एकाच छताखाली मिळतील.

विशेष म्हणजे, येथील उपचारांचे शुल्क ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांशी सुसंगत ठेवले जाणार असल्याने गरिबांसाठी हे उपचार अत्यंत स्वस्त किंवा मोफत ठरणार आहेत. या दौऱ्याचे औचित्य साधून अभिषेक बारणे यांच्या हस्ते थेरगाव हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षे आपली निष्कलंक सेवा देणारे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विशेष गौरव करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. थेरगावमधील या नवीन प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

“कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा उपचार हा अत्यंत खर्चिक असतो, जो सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातो. त्यामुळेच थेरगाव येथे महानगरपालिकेच्या वतीने हे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारले जात आहे. या रुग्णालयामध्ये आम्ही लिनियर ॲक्सिलरेटर आणि पीईटी-सीटी स्कॅनर यांसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देत आहोत. महत्त्वाचे म्हणजे, हे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी जोडले जाणार असल्याने गोरगरीब रुग्णांना येथे मोफत किंवा अत्यंत अल्प दरात सेवा मिळेल. शहरातील एकाही रुग्णाला पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
— अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका)

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"