संतांच्या संगतीत सद्विचारांचा लाभ! : प्रा. डॉ. संजय चौधरी

जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प दुसरे
पिंपरी : ‘संतांच्या संगतीत सद्विचारांचा लाभ होतो!’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे सोमवार, दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘संतांच्या संगती’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना प्रा. डॉ. संजय चौधरी बोलत होते. वारकरी महासंघाचे अध्यक्ष विजय जगताप अध्यक्षस्थानी होते.

य़ावेळी नगरसेवक सुरेश भोईर, ह.भ.प. किसनमहाराज चौधरी, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविकातून जिजाऊ व्याख्यानमालेच्या पस्तीस वर्षांच्या कालावधीत विविध क्षेत्रांतील अनेक विचारवंतांनी समाजप्रबोधन केले आहे, अशी माहिती दिली. किसनमहाराज चौधरी यांनी पिंपरी – चिंचवड शहरातील विविध व्याख्यानमालांमध्ये जिजाऊ व्याख्यानमालेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे गौरवोद्गार काढले.
प्रा. डॉ. संजय चौधरी पुढे म्हणाले की, ‘अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढीपरंपरा यांमधून समाज बाहेर यावा म्हणून संतांनी बंडखोरी केली. अर्थातच या बंडखोरांमध्ये ज्ञानेश्वरमाउली अग्रस्थानी आहेत.
‘संताचे संगती,मनोमार्गगती
आकळावा श्रीपती,येणे पंथे’ असे माउली म्हणतात.
भगवद्गीतेतील ज्ञान सर्व समाजाला उपलब्ध व्हावे म्हणून ज्ञानेश्वरमाउलींनी ‘ज्ञानेश्वरी’ , ‘अमृतानुभव’ , ‘चांगदेव पासष्टी’ , ‘हरिपाठ’ या साहित्याची निर्मिती केली. त्यापासून प्रेरणा घेऊन अनेक संतांनी समाज प्रबोधनासाठी साहित्यनिर्मिती केली म्हणूनच संत बहिणाबाई यांनी, ‘…ज्ञानदेवे रचिला पाया ,उभारले देवालया…’असे म्हटले आहे;
तर तुकोबा,’बुडतां हे जन
न देखवे डोळा,येतो कळवळा ,म्हणोनिया’ असे म्हणतात.
त्यामुळे संत हा वादाचा विषय नसून ते वादातीत आहेत. स्वत: अहंकारातून मुक्त होऊन संतांनी संतसाहित्यातून मांडलेला विचार हा कर्मकांडरहित आहे; कारण माणसाने प्राणितत्त्वापासून मुक्त होऊन मनुष्यतत्त्वाकडे यावे, ही सर्व संतांची तळमळ होती!’ वेगवेगळ्या संतांची वचने उद्धृत करीत प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी विषयाची मांडणी केली.
ॲड. विपुल नेवाळे, महेश गावडे, बाबू नलावडे, चंद्रशेखर स्वामी, धीरज गुत्ते, नवनाथ सरडे यांनी संयोजनात सहकार्य केले. अमित चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.

