अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी 70 हजाराची लाच ; बीट निरीक्षकाला अटक!

पिंपळे गुरव वॉर्ड अतिक्रमण विरोधी विभागाचा बीट निरीक्षक उमेश लोंढेला रंगेहात पकडले
पिंपरी : पिंपळे गुरव येथील एक गुंठ्यातील तीन मजली अनाधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात येणार नाही, यासाठी 70 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय बीटनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवार ११ जून रोजी रंगेहात पकडले. याप्रकरणी एका 58 वर्षीय तक्रारदाराने फिर्याद दिली आहे.

तक्रारदार यांचे पिंपळे गुरव येथे एक गुंठा जागा असून त्यांनी तीन मजली बांधकाम केले आहे. मात्र महापालिकेची परवानगी घेतलेली नव्हती. हे बांधकाम अनाधिकृत असल्याचे दर्शवून महापालिकेच्या ‘ड क्षेत्रीय’ कार्यालयाकडून 25 फेब्रुवारी रोजी तक्रारदारांना नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटिशी विरोधात तक्रारदाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन तक्रारदार यांना महापालिकेत जाऊन नियमानुसार दंड भरून त्यांनी केलेले बांधकाम नियमित करून घेणेबाबतचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी बांधकाम नियमित करण्यासाठी महापालिकेत अर्ज दाखल केला होता.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक उमेश लोंढे हा ‘ड क्षेत्रिय, कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पिंपळे गुरव वॉर्ड अतिक्रमण विरोधी विभागाचा बीट निरीक्षक म्हणून काम पाहत होता. बीटनिरीक्षकाने तक्रारदार यांना भेटण्यास बोलावून अनाधिकृत बांधकाम पाडावे लागेल असे सांगितले. त्यावर तक्रारदाराने न्यायालयाच्या निकालाची प्रत त्याला दाखवली मात्र लोंढे यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष केले. तीन मजली इमारत अनाधिकृत असल्याचे सांगून बीटनिरीक्षकाने या इमारतीवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई न करण्यासाठी 70 हजार रुपये लाचेची मागणी केली .त्यानंतर तक्रारदाराने एसीबी कडे तक्रार केली. गुरुवार 11 जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ‘ड क्षत्रिय’ कार्यालयाच्या पार्किंग मध्ये बीटनिरीक्षक लोंढे याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

