भोसरीत बांगलादेशी महिलेला दहशतवाद विरोधी शाखेने घेतले ताब्यात!

पिंपरी : भोसरी येथील डायमंड लॉज येथे अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेला दहशतवाद विरोधी शाखेने (एटीबी) ने ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार 18 सप्टेंबर रोजी करण्यात आली अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त धीरज पाटील यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद विरोधी शाखेला (एटीबी) गोपनीय बातमी नुसार माहिती मिळाली की, भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत गोविंद गार्डन परिसरामध्ये एक बांगलादेशी महिला अनधिकृतपणे वास्तव्यास आहे. त्यानुसार एटीबीने परिसरामध्ये शोध घेतला असता डायमंड लॉज येथे लवली रोविंदर जाट मध्यप्रदेश येथील संशयित महिला मिळून आली. त्यानंतर एटीबीने पडताळणी केली असता तिचे कडील आधार कार्ड बनावट आढळून आले. या महिलेकडे सखोल चौकशी केली असता तिने तिचे बांगलादेशी नाव लवली मो. अबूबकर सिद्दिक शेख (वय 29, पत्ता- ग्राम बहादूर गच्छा, पो. कुलटी, ठाणा घुटुडीया डूमरिया, जि. खुलना, बांगलादेश) असल्याचे सांगितले. तिने दोन वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात अनधिकृतपणे प्रवेश केला असल्याचे कबूल केले. सध्या ती रोविंदर जाट नावाच्या व्यक्तीसोबत इंदोर मध्य प्रदेश येथे राहत असल्याचे सांगितले.

बांगलादेशी महिलेच्या मोबाईल फोन मधील फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून बांगलादेशातील तिचा मुलगा व आई तसेच इतर नातेवाईकांशी संपर्क करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील कार्यवाहीसाठी महिलेला भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून परकीय नागरिक नोंदणी शाखा पिंपरी चिंचवड यांच्या मार्फत भारताबाहेर बांगलादेशमध्ये हद्दपार करण्याची कार्यवाही विशेष शाखेमार्फत सुरू करण्यात आली आहे असे पाटील यांनी सांगितले. सदरची कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहायुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखा यांनी केली आहे.

