सायबर फसवणुकीसाठी स्वतःचे बँक खाते दिले वापरण्यास!

पिंपरी :सायबर फसवणुकीसाठी स्वतःचे बँक खाते वापरण्यास देऊन 1 लाख 22 हजार रुपयांहून अधिक रकमेचे बेकायदा व्यवहार केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सात डिसेंबर 2025 ते 4 फेब्रुवारी 2020 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र देहूगाव येथे घडली.

या प्रकरणी युवराज माने पोलीस शिपाई यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उमेश जामदार (वय 19, तळवडे गाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने स्वतःच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्याचा वापर करून साथीदारांशी संगणमत केले. संघटित सायबर गुन्हेगारी टोळीचा सदस्य म्हणून त्याने हे खाते फसवणुकीच्या व्यवहारासाठी उपलब्ध करून दिले. या खात्यावर 1 लाख 22 हजार 106 रुपये जमा झाले असून त्यातील 60 हजार रुपये एटीएम द्वारे काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तपास करीत आहेत.

