Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
पिंपरी-चिंचवड

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईला गती देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश!

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईला गती देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश!

कारवाईमध्ये हलगर्जीपणा आढळल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार नियमानुसार कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तसेच अनधिकृत टपऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी क्षेत्रनिहाय सर्वेक्षण करून निष्कासनाची मोहीम जलद गतीने राबविण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले. तसेच कारवाईमध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

viara vcc
viara vcc

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भावनातील मधुकर पवळे सभागृह येथे शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता सुनील बागवानी यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच बीट निरीक्षक उपस्थित होते.

बैठकीमध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत बीट निरीक्षकांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक बीट निरीक्षकाने त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्राची नियमित पाहणी करून नव्याने सुरू झालेली तसेच सद्यस्थितीत सुरू असलेली अनधिकृत बांधकामे ओळखून त्यांचे सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार तातडीने निष्कासनाची कारवाई करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिल्या.

पदपथ मोकळे व वापरायोग्य ठेवण्याची कार्यवाही
महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडांवर झालेली अतिक्रमणे तसेच अनधिकृत व विनापरवाना टपऱ्यांवर प्राधान्याने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच सार्वजनिक पदपथांवर झालेली अतिक्रमणे निष्कासित करून नागरिकांसाठी पदपथ मोकळे व वापरायोग्य ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांच्या प्रकरणांमध्ये केवळ तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी संबंधित क्षेत्रातील परिस्थितीची नियमित पाहणी करून स्वतःहून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे शोधून त्यावर तातडीने कारवाई करावी. याशिवाय, शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमित गस्त व पाहणी करावी. कारवाईसाठी आवश्यक असलेले नियोजन, मनुष्यबळ व यंत्रसामग्री यांचा योग्य समन्वय साधून निष्कासनाची कार्यवाही प्रभावीपणे राबवावी.

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधातील कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी स्पष्ट केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"